“सामना सुरू होण्याआधीच टीम इंडिया – बिनबाद ४०”

भारताविरूद्ध बांगलादेश खेळणार तीन टी २० सामन्यांची मालिका

दिल्लीत प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या भारत-बांगलादेश सामना हलवण्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत उभय संघ रविवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताची विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दिवाळीनंतरच्या प्रदूषणपर्वाचा सामना करणाऱ्या दिल्लीतील सामन्यासंदर्भात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरसह अनेक जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यातच आता गंभीरने आणखी एक वक्तव्य केले आहे. “बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन याच्या बंदीमुळे बांगलादेशचा संघ काहीसा कमकुवत झाला आहे. शाकिब संघात नसणे म्हणजेच सामना सुरू होण्याआधी बांगलादेशचा एक गडी बाद झाल्यासारखे किंवा भारताची धावसंख्या बिनबाद ४० झाल्यासारखी आहे. कारण शाकिबचा अनुभव तितका महत्त्वाचा होता. IPL मध्ये कोलकाता संघात शाकिब आणि मी एकत्र खेळलो आहोत. तो मैदानावर काय कमाल करू शकतो हे मला चांगलेच ठाऊक आहे. शाकिबबद्दलची बातमी समजण्याआधी मला भारत-बांगलादेश मालिका अटीतटीची होईल असे वाटत होते. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. शाकिबच्या अनुपस्थितीत ही मालिका बांगलादेशला कठीण जाण्याची शक्यता आहे”, गंभीरने आपल्या स्तंभात लिहिले आहे.

दरम्यान, अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले. बांगलादेश संघाने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नसली तरी आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. भारत दौऱ्यावर येण्याआधी अष्टपैलू शाकिब अल हसनवर घातलेल्या बंदीमुळे त्यांना धक्का बसला आहे.

READ SOURCE