|| तुषार वैती

प्रत्येक दुबळ्या संघात असा एकतरी खेळाडू असतो, ज्यावर त्या संघाची मदार असते आणि तो प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायकही असतो. अनेक वर्षे तो आपल्या संघाचा तारणहार ठरतो. त्यापैकीच एक नाव म्हणजे शाकिब अल हसन. बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शाकिबच्या कर्तृत्वाची दखल अभावानेच घेतली असेल. पण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत तो आपला दबदबा राखून आहे.

खुलना येथे जन्मलेला शाकिब सुरुवातीला विविध गावांचे प्रतिनिधित्व करत होता. एका स्थानिक पंचाने शाकिबमधील गुणवत्ता हेरल्यानंतर त्याला लीग क्लबमध्ये जाऊन सराव करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला वेगवान गोलंदाज म्हणून सराव करताना शाकिबने टाकलेल्या पहिल्याच फिरकी चेंडूवर बळी मिळवला. त्यानंतर त्याच्या फिरकी गोलंदाजीला सुरुवात झाली. बांगलादेशमधील मगुरा येथील क्रीडा शिक्षा प्रतिष्ठान या राष्ट्रीय क्रीडा संस्थेत शाकिबने आपल्या फिरकी गोलंदाजीचे तंत्र विकसित केले. लहानपणापासून लढाऊ वृत्ती असलेल्या शाकिबने वयाच्या १९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शाकिबच्या आगमनापूर्वी बांगलादेशला सलग ४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र शाकिबच्या पदार्पणानंतर बांगलादेशचा आलेख उंचावत गेला. विलक्षण प्रतिभा असलेला शाकिब पहिल्याच सामन्यापासून संघाच्या विजयात योगदान देत आहे. त्यामुळेच २००९मध्ये वयाच्या २२व्या वर्षी बांगलादेशचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

क्रिकेटपटूसाठी चिकाटी हा गुण महत्त्वपूर्ण आहे आणि शाकिब हा सहनशीलतेचे प्रतीक आहे. जवळपास दशकभरापासून बांगलादेशचा मुख्य कणा असलेल्या शाकिबने आपले संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी समर्पित केले आहे. एक चांगला खेळाडू म्हणून परिपक्व होताना शाकिबला कधी-कधी ११ खेळाडूंची जबाबदारी एकटय़ालाच पार पाडावी लागली आहे. शाकिबने ही खडतर भूमिका निभावताना प्रत्येक जबाबदारीला योग्य न्याय दिला आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे, स्वत:च्या कौशल्यावर असलेला विश्वास आणि लढाऊ वृत्ती यामुळेच शाकिबने नेहमीच आव्हानांचा सामना केला आहे. डावखुरा फिरकीपटू या नात्याने मधल्या षटकांत गोलंदाजी करण्याबरोबरच त्याने ‘पॉवर-प्ले’ किंवा हाणामारीच्या षटकांमध्येही आपल्या संघाची कमान उंचावत नेली आहे.

शाकिब सध्या आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत शाकिबने इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांसारख्या बलाढय़ संघांविरुद्ध शतक झळकावत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून दिली. इतकेच नव्हे तर सर्वाधिक धावा फटकावणाऱ्यांच्या यादीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आणि गोलंदाजीत अव्वल १२ जणांमध्ये आहे. विश्वचषकात एक हजार धावांचा टप्पा गाठणारा आणि एका सामन्यात पाच बळी मिळवणारा तो बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला आहे. आता शाकिबच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बांगलादेशच्या उपांत्य फेरीच्या आशा अद्यापही जिवंत आहेत.

विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने पहिले पाऊल १९९९मध्ये ठेवले. पण १९९९ आणि २००३मध्ये जवळपास सर्वच संघांनी बांगलादेशचा धुव्वा उडवला. पण २००७मध्ये बांगलादेशला ‘सुपर-एट’ फेरीत पोहोचवण्यात शाकिबचा मोलाचा वाटा होता. शाकिबच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच बांगलादेशने भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आणले होते. २०१५मध्येही शाकिबमुळेच बांगलादेशने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

तंत्रशुद्ध फलंदाजी आणि भन्नाट फिरकीसाठी ओळखला जाणाऱ्या शाकिबला गैरवर्तनामुळेही अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. याच गैरवर्तणुकीमुळे शाकिबसाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय संघाचे दरवाजे बंद केले होते. प्रशिक्षकांशी अनेक वेळा पंगा घेणाऱ्या शाकिबने बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची धमकीही दिली आहे. पण एक खेळाडू म्हणून त्याची लोकप्रियता आजही अबाधित आहे. आपण बांगलादेश क्रिकेटचा चेहरा आहोत, हे त्याला स्वत:ला वाटत नाही, हेच त्याचे वेगळेपण आहे.