स्पर्धेत आज भारत विरुद्ध बांगलादेश असा अंतिम सामना रंगणार आहे. भारत हा स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे. भारताने साखळी फेरीत हॉंगकॉंग आणि पाकिस्तानला धुळ चारली. तर सुपर ४ फेरीत बांगलादेश, पाकिस्तान यांना पराभूत केले. या दोनही संघांपेक्षा तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानने मात्र भारताला बरोबरीत रोखले. परंतु त्या सामन्यात भारताचे काही मोठे खेळाडू खेळले नसल्याने भारताने तो नैतिक पराभव तितकासा मनाला लावून घेतला नाही. पण अंतिम सामन्याआधी बांग्लादेशच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे.

बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याला अंतिम सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे.

शाकीब अल हसन

बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शाकीबला भारताविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे. पाकिस्तान विरुद्ध बुधवारी झालेल्या निर्णायक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या करंगळीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले आहे. त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यामुळे त्याला पुढील काही दिवस क्रिकेट खेळता येणार नसल्याचे मेडिकल टीमकडून सांगण्यात आले आहे.