टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सफाई कामगाराची उपमा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा हरभजन सिंगने समाचार घेतला. ‘मला अशा पत्रकारांची लाज वाटते, विराट कोहलीविषयी अशी टीका करणे हा त्या पत्रकाराचा मूर्खपणाच आहे’ अशा शब्दात हरभजनने ऑस्ट्रेलियन पत्रकारावर टीकास्त्र सोडले आहे.

भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने शुक्रवारी फ्रिडमॅनच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.  ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हरभजन म्हणाला, फ्रिडमॅनला कोहली किंवा अन्य कोणत्याही खेळाडूविषयी असे विधान करण्याचा अधिकार नाही. कोहलीविषयी असे ट्विट करणे हा त्या पत्रकाराचा मूर्खपणाच आहे.  ‘एखाद्याची बदनामी करण्यापूर्वी आपण माणूस आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मग तुम्ही ऑस्ट्रेलिया, भारत किंवा पाकिस्तान अशा कोणत्याही देशाचे नागरिक असाल. तुम्ही तुमची प्रतिष्ठा कायम ठेवली पाहिजे आणि आपण कोणाविषयी बोलतोय याचे भान ठेवले पाहिजे’ असे हरभजनने सांगितले. ‘विराट कोहलीने या वादावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. विराटसारखा खेळाडू नाही. हत्ती जेव्हा रस्त्यावरुन चालतो, तेव्हा कुत्रे भूंकणारच अशा तिखट शब्दात त्याने फ्रिडमॅनवर निशाणा साधला.

ऑस्ट्रेलियातील क्रीडा पत्रकार डेनिस फ्रिडमॅनने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. यात कोहलीसह काही भारतीय खेळाडू मैदानात साफसफाई करताना दिसत होते. हा फोटो वर्षभरापूर्वीचा होता. स्वच्छता मोहीमेअंतर्गत खेळाडूंनी हातात झाडू घेतला होता. मात्र फोटो शेअर करताना फ्रिडमॅनने खोडसाळपणा केला होता. लाहोरच्या मैदानात वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू साफसफाईचे काम करत आहेत, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटवरुन फ्रिडमॅनवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. भारतासह पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांनीही फ्रिडमॅनला सुनावले होते.