भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदला शामकीर चषक बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी अझरबैजानच्या ग्रँडमास्टर रौफ मामेदोव्हने बरोबरीत रोखले.
आनंदने अगोदरच्या फेरीत आघाडीवीर वेसली सो याच्यावर सनसनाटी मात केली होती, मात्र तशी कामगिरी त्याला मामेदोव्हविरुद्ध करता आली नाही. कारोकान बचावाच्या डावात मामेदोव्हने कल्पक चाली करीत आनंदला विजयाच्या संधीपासून वंचित ठेवले. सहाव्या फेरीअखेर आनंदचे साडेतीन गुण झाले आहेत तर मामेदोव्ह याचे अडीच गुण आहेत.
विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने साडेचार गुणांसह आघाडी कायम ठेवली आहे. त्याने नेदरलँड्सच्या अनिष गिरी याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. वेसलीचे चार गुण असून त्याने शाख्रीयर मामेद्यारोव्हला बरोबरीत रोखले.