शाम्स मुलानी (८७) आणि आदित्य तरे (खेळत आहे ६९) यांनी अर्धशतकांसह केलेल्या १५५ धावांच्या भागीदारीच्या बळावर मुंबईने तमिळनाडूविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात शनिवारी पहिल्या दिवशी ६ बाद २८४ अशी मजल मारली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या मुंबईच्या फलंदाजांवर तमिळनाडूच्या फिरकी गोलंदाजांनी सुरुवातीला अंकुश ठेवला. डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर (३/७७) आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (३/५८) यांनी मुंबईचा निम्मा संघ १२९ धावांत तंबूत धाडला. परंतु मुलानी आणि तरे यांनी सहाव्या गडय़ासाठी केलेल्या भागीदारीमुळे मुंबईला तारले.

विजय शंकरची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघात निवड झाल्यामुळे बाबा अपराजितकडे तमिळनाडूचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. किशोरने पहिल्या सत्रात मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केले. जय बिस्ता (४१) आणि पदार्पणवीर भूपेन लालवानी (२१) यांनी ५० धावांची दमदार सलामी नोंदवत मुंबईच्या डावाला प्रारंभ केला. किशोरने बिस्ताचा त्रिफळा उडवला, तर लालवानीला पायचीत केले. सिद्धेश लाडने (०) निराशा केली. स्लिपमध्ये अपराजितने त्याचा झेल टिपला.

उपाहारापर्यंत अश्विनच्या खात्यावर एकही बळी जमा नव्हता. पण दुसऱ्या सत्रात अश्विनने पदार्पणवीर हार्दिक तामोरे (२१) आणि सर्फराज खान (३६) यांना बाद केले. सर्फराजने किशोरला दोन उत्तुंग षटकार खेचले. परंतु अश्विनच्या गोलंदाजीवर अपराजितने त्याचा अप्रतिम झेल टिपला. तरे आणि मुलानी यांनी संयमाने मुंबईचा डाव सावरला आणि मग तमिळनाडूच्या गोलंदाजांवर दिमाखात हल्ला चढवला. शतकाकडे कूच करणाऱ्या मुलानीला दिवसातील अखेरच्या षटकात अश्विनने ८७ धावांवर (१५८ चेंडूंत, १४ चौकार, एक षटकार) अश्विनने बाद केले, तर तरे नऊ चौकारांसह ६९ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ८९.४ षटकांत ६ बाद २८४ (शाम्स मुलानी ८७, आदित्य तरे खेळत आहे ६९, जय बिस्ता ४१; रविचंद्रन अश्विन ३/५८, आर. साई किशोर ३/७७)

काझी-मोरेने महाराष्ट्राचा डाव सावरला

नागोठणे : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात विजयासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्राची झारखंडविरुद्धच्या सामन्यातही ५ बाद ८८ अशी केविलवणी अवस्था झाली होती. परंतु अझिम काझी आणि विशांत मोरे यांनी झुंजार अर्धशतकांसह साकारलेल्या भागीदारीमुळे महाराष्ट्राला पहिल्या दिवसअखेर ५ बाद २२७ अशी मजल मारता आली.

नागोठणे येथे सुरू असलेल्या या क-गटातील सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण निम्मा संघ ८८ धावांवर तंबूत परतल्यानंतर काझी आणि मोरे यांनी सहाव्या गडय़ासाठी भागीदारी करीत डावाला स्थर्य दिले. ७ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा काढणाऱ्या मोरेला दुखापतीमुळे डाव सोडावा लागला, तर काझी ७० धावांवर (७ चौकार आणि २ षटकार) खेळत आहे. शुक्ला आणि सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : ८९ षटकांत ५ बाद २२७ (अझिम काझी खेळत आहे ७०, विशांत मोरे जखमी निवृत्त ६७; राहुल शुक्ला २/२०)