पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाला त्यामुळे चेतेश्वर पुजाराला फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. पुजारा- मयांकनं भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मयांकही लवकर बाद झाला. त्यानंतर पहिल्या सत्रात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पुजारा यांनी आणखी विकेट पडू दिली नाही. दोघांनीही अनुभवाच्या जोरावर संयमी फलंदाजी केली. २५ षटकानंतर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात ४१ धावा केल्या. या सामन्यादरम्यान इंग्रजी समालोचन करणाऱ्या शेन वार्ननं पुजाराबाबत वापरलेल्य एका शब्दामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यानं समालोचन करताना पुजारासाठी टोपणनाव वापरलं. वॉर्न यानं वारंवार पुजाराचा स्टीव्ह या नावानं उल्लेख केला. यामुळे चाहते नाराज झाले आहेत. कारण हे नाव वर्णद्वेषी असल्याचा ठपका चाहत्यांनी ठेवला आहे. तसेच वॉर्न यानं याबाबत माफी मागावी अशीही मागणी केली आहे.

स्टीव्हमध्ये काय चुकीचं?
तुम्ही विचार करत असाल की स्टीव्ह याममध्ये काय चुकीचं आहे. मात्र, गेल्याच महिन्यात क्रिकेटपटू अझीम रफीक यांनी यॉर्कशायर क्लबमध्ये भेदभाव होत असल्याचा दावा केला होता. कृष्णवर्णीय खेळाडूला यॉर्कशायर क्लबचे अन्य खेळाडू स्टीव्ह म्हणूनच बोलवाचे. जेव्हा चेतेश्वर पुजारानं हा क्लब जॉईन केला, तेव्हा त्यालाही याच नावानं उच्चारलं गेलं. कारण त्याचं नाव त्यांना उच्चारण्यास कठीण जात होतं.

हाच धागा पकडत सोशल मीडियावर शेन वॉर्न याच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय वॉर्न यानं याबाबत जाहीर माफीही मागावी असं नेटकरी म्हणत आहेत.


चेतेश्वर पुजारानं पहिल्या डावात ४३ धावांवर खेळी केली. चांगल्या सुरुवातीनंतर पुजाराला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. दिवसाखेर भारतीय संघानं सहा गड्यांच्या मोबदल्यात २३३ धावा केल्या आहेत.