ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला १९ जुलै रोजी ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात येणार आहे. लॉर्ड्सवर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चहापानादरम्यान हा कार्यक्रम होणार असल्याचे आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहे. २०१२-१३ या वर्षांत हा मान मिळवणाऱ्या ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), ईनिड बेकवेल (इंग्लंड) आणि ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) यांच्या पंक्तीत तो सामील झाला आहे. ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये सहभागी झालेला वॉर्न हा ६९वा क्रिकेटपटू आहे. वॉर्नने १९९२ ते २००७ या कालखंडात १४५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २५.४१च्या सरासरीने ७०८ कसोटी बळी घेतले आहेत. सातशे कसोटी बळी घेणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय त्याने १९४ एकदिवसीय सामन्यांत २५.७३च्या सरासरीने २९३ बळी घेतले आहेत.