इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गेल्या काही वर्षांत एक मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली आहे. पैसा आणि प्रसिद्धीमुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय संघाकडे दुर्लक्ष करून आयपीएलमध्ये भाग घेतात. पण ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नला ही गोष्ट खटकली आहे. आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या अशा खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघात निवडू नये, असे वॉर्न म्हणाला. वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने २००८मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

आयपीएल २०२१ करोनामुळे २९ सामन्यांनंतर पुढे ढकलण्यात आले. आता उर्वरित सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळले जातील. मात्र यावेळी अनेक संघांना वेगवेगळ्या देशांचे दौरे करावे लागत आहेत. यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या संघांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आयपीएल आणि देश ही निवड खेळाडूंसाठी मोठे प्रश्नचिन्ह ठरते.

वॉर्नने एका पॉडकास्टमध्ये म्हणाला, ”आयपीएल किंवा इतर लीगमधून पैसे मिळवणाऱ्या खेळाडूंचा मला त्रास होत नाही, ही चांगली गोष्ट आहे. जर त्याला पैसे कमवायचे असतील, तर त्यांनी ते करावे. पण जर तुम्हाला तुमच्या देशासाठी क्रिकेट खेळायचे असेल आणि मग तुम्ही आयपीएलची निवड कराल, तर राष्ट्रीय संघात असे खेळाडू निवडणे योग्य नाही. कारण मग असे होईल की खेळाडू निमित्त घेऊन विश्रांती घेतील आणि कसोटी क्रिकेट खेळणार नाहीत. ते पैशामुळे देशासाठी खेळण्याची संधी गमावतील. ही एक वाईट गोष्ट आहे.”

हेही वाचा – युवराज सिंग आणि ख्रिस गेल ऑस्ट्रेलियात घालणार धुमशान?

वॉर्न पुढे म्हणाला, ”कसोटी क्रिकेट खूप महत्वाचे आहे आणि खेळाडू क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपामध्ये खेळूनच त्याची चाचणी करतो. या व्यासपीठावरच खेळाडूची खरी ओळख पटली जाते. जर खेळाडू कसोटी सामने खेळतील आणि नंतर लीगची निवड करतील, तर त्यात कोणतीही अडचण नाही. जर कोणी सांगितले, की तुम्हाला तीस लाख डॉलर्स मिळतील, तर तुम्ही कुठेतरी जा आणि आपल्या कुटुंबापासून सहा आठवड्यांसाठी दूर राहा. हे पैसे घेणे सोपे आहे. परंतु जर आपण स्वत: ला एक मौल्यवान क्रिकेटपटू म्हणत असाल आणि आपल्याला क्षमतेची चाचणी घ्यायची असेल तर ते करण्यासाठी फक्त एक जागा आहे आणि ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे, विशेषत: कसोटी क्रिकेट.”