IPL 2019 च्या फायनलमध्ये शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला १ धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज दिली होती. एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे प्रसंगी संयमी तर काही वेळा फटकेबाजी करत झुंजार अर्धशतक ठोकले होते. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली, पण दुहेरी धाव घेताना तो शेवटच्या षटकात ८० धावांवर धावचीत झाला होता. त्यामुळे संघाला विजय मिळवून देण्याची त्याची इच्छा अपूरी राहिली. त्याने ५९ चेंडूत ८० धावा केल्या. पण महत्वाचे म्हणजे ही खेळी त्याने पायाला दुखापत झालेली असताना आणि त्या जखमेतून रक्त वाहत असताना केली होती.

चेन्नई संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने याबाबत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इन्स्टाग्रावरून माहिती दिली होती. ”त्याच्या (वॉटसन) गुडघ्याजवळ असलेलं रक्त तुम्ही पाहू शकता का? सामन्यानंतर वॉटसनला तब्बल ६ टाके पडले. मैदानावर डाइव्ह मारताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण कोणालाही काहीही न सांगता वॉटसन एकटा खेळत राहिला”, असे हरभजनने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लिहिले होते. त्यामुळे वॉटसनचा लढवय्या असा उल्लेख सोशल मीडियावर चाहत्यांनी केला होता.

असा रंगला होता सामना

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक (२९) झेलबाद झाला. पाठोपाठ रोहितही (१५) झेलबाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव १५, कृणाल पांड्या ७ आणि ईशान किशन २३ धावा करून माघारी परतले. हार्दिक पांड्याही १६ धावाच करू शकला. पण Birthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस २६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रैना ८, रायडू १, कर्णधार धोनी २ धावांवर परतले. रविंद्र जाडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या मदतीने शेन वॉटसनने प्रयत्न सुरूच ठेवले. झुंजार अर्धशतक ठोकल्यानंतर तो शेवटच्या षटकात दुहेरी धाव घेताना ८० धावांवर धावचीत झाला. त्यानंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने शार्दूल ठाकूरला पायचीत केले आणि मुंबईला विजय मिळवून दिला.