News Flash

प्रो-कबड्डीवाल्यांच्या नावानं चांगभलं!

प्रो-कबड्डी लीगला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल मी संयोजक आनंद महिंद्रा, ‘मशाल’वाले चारू शर्मा, सिनेकलावंत अभिषेक बच्चन यांचे आणि टीव्हीच्या माध्यमातून हा मराठमोठा खेळ सर्वाच्या घरोघरी

| September 6, 2014 02:34 am

(कबड्डीमहर्षी बुवा ऊर्फ शंकरराव साळवी आज आपल्यात असते तर प्रो-कबड्डीच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने त्यांचे भाषण निश्चितच झाले असते. ते कसे झाले असते, त्याची ही झलक.. बुवांबद्दल पूर्ण आदर राखून..)
इथं जमलेल्या माझ्या कबड्डीरसिकांनो,
प्रो-कबड्डी लीगला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल मी संयोजक आनंद महिंद्रा, ‘मशाल’वाले चारू शर्मा, सिनेकलावंत अभिषेक बच्चन यांचे आणि टीव्हीच्या माध्यमातून हा मराठमोठा खेळ सर्वाच्या घरोघरी पोहोचवणाऱ्या स्टारवाल्यांचे आभार मानतो. देशातल्या कबड्डीपटूंना जो भरघोस धनलाभ झाला आणि कबड्डी ज्या उंचीवर गेली ते पाहिलं की, ऑलिम्पिकमध्ये हा खेळ पोहोचण्याचे स्वप्न आता दूर नाही, याची मला खात्री वाटते. (टाळ्या) आमच्या जनार्दनसिंगांनी काही मंडळींना हाताशी धरून कबड्डीवर राज्य केलं. त्यांनी काही वर्षांपूर्वी कबड्डी प्रीमियर लीगचा प्रयोग केला होता. पण तो त्यांना जमला नाही. त्यात व्यावसायिक गणितं असतात. ती महिंद्रा आणि चारू यांना बरोबर समजली. त्यांनी कबड्डीच्या मैदानावर नीता अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, विजेंदर सिंग, ऐश्वर्या राय, वीरेंद्र सेहवाग, झालेच तर लालकृष्ण अडवाणी अशा.. काय म्हणता तुम्ही त्यांना.. हां.. सेलेब्रिटी.. तर अशा मंडळींना आणले. मीसुद्धा त्या काळात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही. व्ही. गिरी यांना कबड्डीच्या मैदानावर आणले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक , शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी कबड्डीवर खूप प्रेम केलं. शरद पवार म्हणजे तर कबड्डीचे आधारस्तंभ. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी पाठबळ दिलं. आर्थिक मदत केली. शिवसेनाप्रमुखांनाही कबड्डी आवडायची. म्हणून युतीच्या काळात शिवशाही कबड्डी स्पर्धा सुरू झाली. मी शिवाजी पार्कवर पहिल्या शिवशाहीच्या फायनलला एका चढाईत लाखोंची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. काही मंडळींनी आठवणीनं ते दिले, काहींनी टाळले. (माफक हशा) पण कबड्डीचं वैभव मोठं. आमचे पु. ल. देशपांडेसुद्धा कबड्डीच्या मैदानावर महिलांचा सामना पाहायला आले होते. अक्षरश: भारावले होते ते. तेव्हाचे त्यांचे उद्गार अजूनही आठवतात. ते म्हणाले होते, ‘‘काय पाहता ती अजंठा-वेरुळ लेण्यातील निर्जीव शिल्पे? इथे मैदानावर या.. या रणरागिणींचा खेळ पाहा.. ही खरी जिवंत शिल्पे!’’ (टाळ्याच टाळ्या)
प्रो-कबड्डीच्या मॅटवर अनेक नवे नियम दिसले. आमच्या खेळाडूंना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला मिळालं. चांगलं खायला-प्यायला मिळालं. एकंदर अच्छे दिवस आलेत म्हणायचं. बरं वाटलं हे पाहून. आमच्या काळात मोठय़ा स्पर्धा व्हायच्या, त्या शाळांना सुट्टय़ा पडल्या की. शाळेची बाकं बाजूला सरकवून गाद्या टाकून खेळाडूंना राहायची व्यवस्था व्हायची. (हंशा) आमच्या काळातसुद्धा चांगल्या स्पर्धा झाल्या, पण भव्यदिव्य कबड्डी स्पर्धा कशी घ्यावी, याचा प्रो-कबड्डी म्हणजे वस्तुपाठच आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (टाळ्यांचा कडकडाट)
पण एक गोष्ट इथं सांगितलीच पाहिजे. कबड्डी महाराष्ट्रानं वाढवली, टिकवली. पण मुंबईत वरळीला सामने असले तरी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना साध्या तिकिटाची विचारणा होऊ नये? महाराष्ट्रात सामने होतात, पण त्याचा आम्हाला काय फायदा? आज अंतिम सामन्याला मला बोलावलं. म्हणून त्याचा मी जाब विचारत आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंना तुम्ही कमी लेखता आणि संघटक तुम्हाला नकोसे झालेत का? आमचे पाथ्रीकर यांनी मात्र तुम्हाला पहिल्यापासून विरोध केला. कबड्डीच्या जिवावर तुम्ही तूप-रोटी खाताय असं त्यांना वाटलं. पण सध्या त्यांनी पक्षांतर केलं आहे. राष्ट्रवादीला रामराम करून भाजपला ‘नमो नम:’ करणाऱ्या पाथ्रीकरांचा आणि गेहलोतांचा पक्ष एकच. त्यामुळे आता ते काय बोलणार, याची मलाही उत्सुकता आहे. (टाळ्या)
माझं भाषण जरा जास्तच लांबतंय.. पण मी बोललो नाही, तर तुम्हाला कबड्डीचा इतिहास कळणार नाही. या प्रो-कबड्डीवाल्यांनी एकाही व्यक्तीला भाषण करायला दिलं नाही. मोठमोठय़ा मंडळींना लेकाचे विचारतात कसे? कशी वाटली लीग?.. आणि तुम्ही कधी खेळलात? दोन मिनिटांत पाहुणा जागेवर. महाराष्ट्रातले मंत्री, खासदार, आमदार सोडाच नगरसेवक, शाखाप्रमुखसुद्धा माइक हातात घेतल्यावर अर्धा-एक तास सहज चढाया करतो. (जोरदार हशा) मी लहानपणी कसा मैदानावर खेळलो आणि राजकीय कारकिर्दीत कसे कबड्डी खेळायला लागते, याचा पाढा वाचतो. तेवढय़ा वेळात एखादा सामना होईल! पण या पुढाऱ्यांच्या पैशावरच आमची कबड्डी. त्यांचे काही हजार म्हणजे आमची बक्षिसं. मग कोण थांबवणार त्यांना? बोला पठ्ठय़ांनो. (हशा) आमच्या माइकबहाद्दर ‘प्रताप’रावांनी माइक हातात घेतला की सारी विशेषणं, अलंकार त्यांच्या पायांशी लोळण घ्यायला लागतात. उर्दू शेरोशायरी, चंद्र-सूर्य-तारे सारे काही मग भूमीवर अवतरतात. गल्लीत फुटकळ पुढारीसुद्धा मग त्यांच्यासाठी अध्वर्यू नाहीतर दिग्गज होतो. पण ते तरी काय करणार म्हणा? अशी स्तुतिसुमनं उधळल्याशिवाय ही मोठमोठी मंडळी आणि त्यांचा पैसा कबड्डीत येणार कसा? आता गल्लोगल्ली अशा माइकबहाद्दरांची फौज उभी राहिली आहे. (हशा आणि टाळ्या)
तुमच्या टाळ्या वाढल्या आहेत. (हसतात) दादर-प्रभादेवीत लहानाचा मोठा झाल्यामुळे तुमच्या भावना मला पोहोचल्या आहेत. कबड्डीचे प्रो-कबड्डी झाले, आता ऑलिम्पिक होवो अशा खेळाला पुन्हा शुभेच्छा देतो. सध्या भारतीय कबड्डीमधील इलेक्शन आणि सिलेक्शनवर माझा विश्वास राहिलेला नाही. सर्वत्र दलालांचाच सुळसुळाट दिसतो आहे. ही लीग मध्यावर आली, तेव्हाच फायनलला कोण संघ येणार आणि कोण जिंकणार, हे मला इतक्या वर्षांच्या अनुभवातून माहीत होतं. (हशा) आता जास्त बोलणार नाही. यापुढे कबड्डीच्या व्यासपीठावर मोठमोठाली भाषणं न करण्याचा मी संकल्प करतो, तुम्हीही माझा शब्द पाळाल अशी आशा बाळगतो!.. आणि हो, कोणत्याही कबड्डी स्पर्धाना पुढाऱ्यांचे भले मोठे फलक आणि कटआऊट्स दिसतात, त्याऐवजी कबड्डीपटूंचे दिसतील, ही माझी तुमच्याकडून आणखी एक अपेक्षा असेल. कबड्डीला ऊर्जितावस्थेत नेण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्नशील राहू, जय हिंद, जय महाराष्ट्र!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:34 am

Web Title: shankarrao salvi would have speech at pro kabaddi final
Next Stories
1 पंकज अडवाणी इंडिया ओपन बिलियर्ड्स स्पर्धेत खेळणार
2 भारतीय पथकाबाबत निर्णय नाही -सोनवाल
3 बीसीसीआयने बोथम यांना फटकारले
Just Now!
X