ENG vs WI 1st Test : करोनामुळे बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अखेर सुरू झालं. पहिल्याच कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी केली. पण पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी टिपणारा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियल याला सामनावीर घोषित करण्यात आले.

संपूर्ण सामन्यात ९ बळी घेत गॅब्रियलने एक महत्त्वाचा पराक्रम केला. गॅब्रियलची ही कामगिरी इंग्लंडच्या भूमीवरील वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने केलेली गेल्या २० वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. गॅब्रियल सामन्यात १३७ धावा देत ९ बळी टिपले. करोनानंतर सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला बळी मिळवण्याचा मानदेखील त्यानेच मिळवला. या आधी २००० साली वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श याने लॉर्ड्स मैदानावर कसोटी खेळताना ११७ धावांत १० बळी टिपले होते. पण त्यानंतर २० वर्षात गॅब्रियची कामगिरी ही सर्वोत्तम ठरली.

असा रंगला सामना-

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती.

इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली आणि ९८ धावांची भागीदारी केली. क्राव्हलीने ७६ तर स्टोक्सने ४६ धावा केल्या. पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या.

शेवटच्या दिवशी २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरूवात अतिशय खराब झाली. पण रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार होल्डरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.