मुंबई : सात ऑलिम्पिक पदकविजेती अमेरिकेची नामांकित कलात्मक जिम्नॅस्टिक्सपटू शॅनन ली मिलरची १७व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबई मॅरेथॉन स्पर्धा १९ जानेवारी, २०२० या दिवशी होणार असून अमेरिकेच्या ऑलिम्पिक ‘हॉल ऑफ फेम’ने दोन वेळा गौरवण्यात आलेली ४२ वर्षीय मिलर ही एकमेव महिला क्रीडापटू आहे. तिला २००६मध्ये वैयक्तिक, तर २००८मध्ये सांघिक कामगिरीसाठी या सन्मानाने गौरवण्यात आले होते.

‘‘खेळामध्ये समाजाला एकत्रित आणण्याची ताकद असून मॅरेथॉन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते,’’ असे मिलर म्हणाली.

मिलरने सात ऑलिम्पिक (प्रत्येकी दोन सुवर्ण-रौप्य व तीन कांस्यपदके) पदकांबरोबरच तब्बल नऊ जागतिक पदकेही मिळवली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. १९९२च्या ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह एकूण पाच पदके मिळवणाऱ्या मिलरने कारकीर्दीत ५९ आंतरराष्ट्रीय, तर ४९ राष्ट्रीय विजेतेपदे मिळवली आहेत.