News Flash

‘एक राज्य, एक मत’ निर्णयाने झोप उडवली

तुमचीही विकेट जाऊ शकते!

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे बुधवारी माजी अध्यक्ष शरद पवार (मध्यभागी) यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी डायना एडल्जी (डावीकडून), दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर व सुनील गावस्कर उपस्थित होते. 

‘‘भारतामध्ये क्रिकेटची सुरुवात मुंबईपासून झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जेव्हा स्थापन करण्यात आले, तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संस्थापक सदस्य होती. पण लोढा समितीने जेव्हा ‘एक राज्य, एक मत’ हा निर्णय अमलात आणण्याचे ठरवले, तेव्हापासून माझी झोप उडाली आहे,’’ असे मत एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी सत्काराप्रसंगी व्यक्त केले. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल एमसीएने बुधवारी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होती. या वेळी माजी क्रिकेटपटू माधव आपटे, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, डायना एडल्जी या माजी भारतीय क्रिकेटपटूंसह एमसीएचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

‘‘आयसीसीचे अध्यक्ष असताना वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवू शकलो, याचा सर्वात जास्त आनंद आहे. तसेच मी खेळाडू व पायाभूत सुविधा यांच्यावर जास्त लक्ष दिले असले तरी कधीही खेळाडूंची निवड, त्यांची शिफारस किंवा खेळाचे नियम यामध्ये मी कधीही लक्ष दिले नाही. ही जबाबदारी मी नेहमीच माजी क्रिकेटपटूंना सोपवली,’’ असेही पवार यांनी सांगितले.

गावस्कर यांनी आपल्या खुमासदार शैलीत या सोहळ्यात रंगत आणली. हास्यविनोदाने सुरुवात करत पवार यांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी अलवारपणे सर्वासमोर आणले. गावस्कर म्हणाले, ‘‘पवार यांनी जर ललित मोदी यांना परवानगी दिली नसती तर आयपीएलसारखी क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम लीग आपल्याला पाहायला मिळाली नसती. आयपीएलमुळे आता क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवता येऊ शकते, हेदेखील आपण पाहिले आहे. पूर्वी रणजीपटूंना जास्त मानधन नव्हते, पण पवार यांनी मानधनात वाढ केली, त्याचबरोबर माजी क्रिकेटपटूंना आर्थिक मदतही केली. आता काही कारणास्तव तुम्ही क्रिकेट प्रशासनापासून थोडे लांब गेला आहात, पण क्रिकेटपासून मात्र लांब राहू नका.’’

‘‘उत्तम क्रिकेट प्रशासक कसा असावा, याचा उत्तम वस्तुपाठ पवार यांनी दाखवून दिला आहे. पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले पवार हे बीसीसीआय आणि एमसीएचे एकमेव माजी अध्यक्ष आहेत,’’ असे एमसीएचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले.

तुमचीही विकेट जाऊ शकते!

माझे सासरे (सदूभाऊ शिंदे) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांच्याबद्दल मी घरातील व्यक्तींकडूनच ऐकले आहे. ‘‘तुमचे सासरे गुगली गोलंदाजी करायचे, त्यामुळे तुमची विकेट जाऊ शकते, असे मला घरातून सांगितले जाते,’’ असे जेव्हा पवार यांनी सांगितले, तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:21 am

Web Title: sharad pawar on bcci
Next Stories
1 भारत बाद फेरीसाठी पात्र
2 अश्विनला वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार
3 भारतात लवकरच आशियाई खो-खो स्पर्धा
Just Now!
X