राजकारण आणि भारतीय क्रिकेट मंडळातील प्रभावी आणि गाजलेल्या काही नावांमध्ये अग्रस्थानी असलेल्या शरद पवार यांना मुंबई क्रिकेट मंडळाच्या (एमसीए) अध्यक्ष पदावरुन काढता पाय घ्यावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी आपल्याला न्यायालयाचे निर्णय मान्य आहेत, असे सांगत अध्यक्षपद सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्यात मुंबई क्रिकेटअसोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट मंडळाशी देखील शरद पवार संलग्न आहेत.
बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीनंतर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेतला होता. न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या शिफारशीनुसार ‘एक राज्य एक मत’ असा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यानंतर एमसीएच्या संलग्नतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लोंढा समितीच्या अन्य एका शिफारशीनुसार, ७० वयापेक्षा अधिक वयाची व्यक्ती बीसीसीआय तसेच संलग्न संघटनांमध्ये कार्यरत असता कामा नये. असा प्रस्ताव मांडला होता. एमसीएचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार ७५ वर्षांचे आहेत. त्यामुळे या  शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास येत्या सहा महिन्यांत त्यांना पदत्याग करावा लागू शकतो. त्यामुळे येत्या सहा महिन्यातच आपण पद सोडू असे जाहीर करत योग्य वेळ येताच त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.