ऑस्ट्रेलियातील मालिका विजयानंतर टीम इंडिया मायदेशात परतली. खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागतही करण्यात आलं. मात्र, मुंबईत येणाऱ्यापूर्वी खेळाडूंसमोर सरकारी नियम उभा राहिला. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवता येणार की नाही, या विचारात असलेल्या खेळाडूंसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि प्रश्न सुटला, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर खेळाडूंचं विमान मुंबई विमानतळावर उतरू शकलं.

ऑस्ट्रेलियाला नमवत भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ जिंकली. या अविस्मरणीय विजयानंतर भारतीय संघ मायदेशी परतला. संघातील टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर परतले. मात्र, परदेशातून येत असल्यानं खेळाडूंना क्वारंटाइन व्हावं लागणार होतं. त्यातच पुढील महिन्यात इग्लंडसोबत मालिका सुरू होत असल्यानं खेळाडूंचा वेळ क्वारंटाइनमध्येच जाणार होता. अडचणीत असलेल्या खेळाडूंसाठी शरद पवार धावून गेले. शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून खेळाडूंना क्वारंटाइनमधून सूट देण्याबद्दल चर्चा केली. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वारंटाइनच्या नियमातून वगळण्यात आला. विमानतळावर RTPCR चाचणी करुन खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरन्टाइन व्हावं लागणार होतं. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरन्टीन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश महापालिकेला दिले.