जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू मारिया शारापोव्हा हिने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत झकास सलामी केली. तिने ख्रिस्तिना मॅकहेल हिच्यावर ६-४, ६-२ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली.

कारकीर्दीत पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या शारापाव्हा हिला उत्तेजक सेवनाबद्दल दीड वर्षे स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. बंदीचा हा कालावधी नुकताच संपला आहे. येथे तिने उपांत्य फेरीत स्थान मिळविले तर तिला विम्बल्डन स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट स्थान मिळेल. रविवारपासून फ्रेंच ओपन स्पर्धा सुरू होत असून तेथे विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविण्यासाठी ती प्रयत्न करीत आहे.

शारापाव्हा हिने येथे यापूर्वी २०११, २०१२ व २०१५ मध्ये अजिंक्यपद पटकाविले होते.

पुरुषांच्या पहिल्या फेरीत नवव्या मानांकित डेव्हिड गॉफिन याने थॉमस बेलुसी याच्यावर ६-७ (५-७), ६-३, ६-४ अशी मात केली. पहिला सेट गमावल्यानंतर डेव्हिड याने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळविले आणि विजयश्री खेचून आणली. अमेरिकन खेळाडू सॅम क्युएरी याने उत्कंठापूर्ण लढतीत अकराव्या मानांकित लुकास पौली याच्यावर ७-६ (८-६), ७-६ (१०-८) असा रोमहर्षक विजय नोंदविला. बाराव्या मानांकित टॉमस बर्डीच यालाही पहिल्या फेरीत विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्याने जर्मनीच्या मिश्चा जेवेरेव याचा ७-६ (९-७), ६-४ असा पराभव केला. जॉन लेनार्ड स्ट्रफ याने ऑस्ट्रेलियन खेळाडू बर्नार्ड टॉमिक याला ६-७ (६-८), ६-१, ६-४ असे हरविले.

माजी अमेरिकन विजेता जुआन मार्टिन डेलपोत्रो याला ग्रिगोर दिमित्रोव याच्याविरुद्ध ३-६, ६-२, ६-३ असा विजय मिळविताना चिवट झुंज स्वीकारावी लागली.