विश्वचषक स्पर्धेतील पात्रता अनिश्चित; मनिका बात्राची हॅट्ट्रिक

आशियाई टेबल टेनिस स्पर्धा

आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेच्या माध्यमातून विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवण्याच्या शरथ कमलच्या स्वप्नांना शुक्रवारी सुरुंग लागला. भारताच्या मनिका बात्राने सलग तीन विजयांची नोंद करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर हरमीत देसाईचे आव्हानही संपुष्टात आले.

गट साखळीत त्याला केवळ एका विजयावर समाधान मानावे लागले. त्याने अखेरच्या लढतीत जून मिझुटानीवर मात केली. आशियाई स्पर्धेतील त्याची ही आत्तापर्यंतची निराशाजनक कामगिरी ठरली. हरमीतचीही कामगिरी समाधानकारक झाली नाही. पहिल्या फेरीत हरमीतने सौदी अरेबियाच्या अब्दुलाझीझ अल-अब्बादवर ३-० असा विजय मिळवला, परंतु दुसऱ्या फेरीत इराणच्या निमा अलामियनने अटीतटीच्या लढतीत ३-२ असा विजय मिळवला.

आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या १७ वर्षीय मनिकाने कतारच्या एैया मोहम्मदचा १३-११, ११-८, ११-७ असा पराभव करून स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. त्यापाठोपाठ तिने नेडा शासवरी (११-५, ११-८, ११-६) आणि थायलंडच्या सुथासिनी सावेट्टाबट (११-८, ८-११, ८-११, ११-४, ११-८) यांच्यावर विजय मिळवला.