News Flash

आता मनिकाच्या खांद्यावर भारताची जबाबदारी!

गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने चार पदकांची कमाई केली.

| April 20, 2018 03:10 am

शरथ कमल

टेबल टेनिसपटू शरथ कमलचा कौतुकाचा वर्षांव

 नवी दिल्ली : दहा वर्षांहून अधिक काळ भारतीय टेबल टेनिसचा भार आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या शरथ कमलने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. विशेषत: मनिका बत्राच्या कामगिरीवर अधिक आनंद व्यक्त करताना भारताला नवी नायिका मिळाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे निश्चिंतपणे भारतीय टेबल टेनिसची जबाबदारी मनिकाच्या खांद्यावर सोपवण्यास तयार असल्याचे तो म्हणाला.

गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने चार पदकांची कमाई केली. यामध्ये सांघिक गटाचे आणि महिला एकेरीच्या सुवर्णपदकाचा समावेश आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचीच चर्चा सर्वत्र झाली आणि यापूर्वी टेबल टेनिस खेळाची अशी चर्चा कधीच झाली नसच्याचे नमूद करत कमल म्हणाला, ‘‘मनिकासाठी मी खूप आनंदित आहे. या खेळाला पुढे नेण्याची जबाबदारी आता तुझी असल्याचे मी मनिकाला अखेरच्या दिवशी सांगितले. गेली १० वर्षे हे आव्हान मी पेलले.’’

‘‘जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या आणि तीन ऑलिम्पिक पदके नावावर असलेल्या फेंग तिआन्वेईला दोन वेळा पराभूत करणे, ही सोपी गोष्ट नाही. सिंगापूरची फेंग अजूनही जगातील अव्वल खेळाडू आहे. कामगिरीचा स्तर उंचावण्याचा मनिका सतत प्रयत्न करते आणि आशा करतो भविष्यात ती यापेक्षा अधिक यश मिळवेल,’’ असे कमल म्हणाला.

राष्ट्रकुल स्पर्धेत कमलने तीन पदके पटकावली आणि त्यामुळे त्याला आणखी चार वर्षे खेळण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. २०२०मध्ये टोकियोत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही ३५ वर्षीय कमलची पाचवी आणि कदाचित अखेरची स्पर्धा असणार आहे.

‘‘गोल्ड कोस्ट येथे मला अनेक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि खेळाडू भेटले; त्यांनी माझ्या खेळाची प्रशंसा केली आणि मी २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही खेळू शकतो असे सांगितले. त्यामुळे मीही २०२२पर्यंतचा विचार करत आहे,’’ असे तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 3:10 am

Web Title: sharath kamal is very happy with the way manika batra performed in the cwg 2018
Next Stories
1 रोनाल्डोने रेयालचा पराभव टाळला
2 राष्ट्रकुल स्पर्धाचे ‘अच्छे दिन’
3 ड्वेन ब्राव्होच्या ‘रन द वर्ल्ड’ मध्ये नाशिकचा सचिन खैरनार
Just Now!
X