भारताच्या शरथ कमालने दोहा येथे चालू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानच्या रमीझ मुहम्मदवर आरामात विजय मिळवून चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.

जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकावर असलेल्या शरथने क्रमवारीत ६९०व्या स्थानावर असलेल्या रमीझला २३ मिनिटांत ११-४, ११-१, ११-५, ११-४ असे पराभूत केले. याआधीच्या सामन्यात शरथने जी. साथीयानकडून पराभव पत्करला होता.

शरथ २००४च्या अ‍ॅथेन्स, २००८च्या बीजिंग आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ‘‘वयाच्या ३८व्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र होणे, हे माझ्यासाठी खास आहे. साथियान आणि हरमत देसाई यांची साथ माझ्या यशात महत्त्वाची आहे,’’ असे शरथने सांगितले.