अहमदनगरचा शार्दूल गागरे व कोल्हापूरची ऋचा पुजारी यांनी येथे नुकत्याच झालेल्या जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेतील अनुक्रमे खुला व मुलींच्या गटात सर्वोत्तम महाराष्ट्रीयन खेळाडूचा मान मिळविला.
शार्दूल याने तेरा फेऱ्यांमध्ये आठ गुणांची कमाई केली. त्यामध्ये त्याने सहा डाव जिंकले तर चार डाव बरोबरीत सोडविले. त्याने २६वे स्थान मिळविले. खुल्या गटातच महाराष्ट्राच्या अभिमन्यू पुराणिक याने साडेसात गुणांसह ४६वा क्रमांक मिळविला. शैलेश द्रविड याने ४९वे स्थान मिळविताना सात गुणांची नोंद केली. रोशन रंगराजन व प्रतीक पाटील यांनी प्रत्येकी सहा गुण मिळविले. त्यांना अनुक्रमे ८८वे आणि ८९वे स्थान मिळाले. अनिष गांधी, सम्माद शेटे व अथर्व गोडबोले यांनी प्रत्येकी साडेपाच गुण नोंदविले. हर्षित राजा व सुयोग वाघ यांनी प्रत्येकी पाच गुण मिळविले. मिथिल आजगावकर याला साडेतीन गुणांवर समाधान मानावे लागले.
मुलींमध्ये ऋचा हिने साडेसहा गुणांसह ३५वे स्थान मिळविले. तिने चार डाव जिंकले, तर पाच डावांमध्ये तिने बरोबरी स्वीकारली. श्वेता गोळे व ऋतुजा बक्षी यांनीदेखील तेवढय़ाच गुणांची कमाई केली, मात्र सरासरी गुणांकनानुसार श्वेताला ३९वे तर ऋतुजाला ४४वे स्थान देण्यात आले. साक्षी चितलांगी, आकांक्षा हगवणे व सुप्रिया जोशी यांनी प्रत्येकी सहा गुण मिळाले. त्यांना अनुक्रमे ४८ वे, ५०वे आणि ५१वे स्थान देण्यात आले. तेजस्विनी सागर हिने साडेपाच गुणांसह ५६वे स्थान मिळविले. शाल्मली गागरे हिने पाच गुण मिळविले.