करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात क्रिकेट स्पर्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारने देशातील मैदानं व Sports Complex सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र क्रिकेटपटूंसाठी आयसीसी व बीसीसीआयने सरावासाठी काही अटी व नियम घालून दिले आहेत. या नियमांचं पालन करत Outdoor Training सुरु करणारा शार्दुल ठाकूर हा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पालघर येखील आपल्या घराजवळील मैदानावर शार्दुलने आपला सराव सुरु केला आहे. शार्दुल पालघरमध्ये असताना, पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर सराव करतो.

स्थानिक क्रिकेटमध्ये शार्दुल ठाकूर मुंबईचं प्रतिनिधीत्व करतो. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला भारतीय संघाच संधी देण्यात आली होती, ज्याचा त्याने आतापर्यंत चांगला फायदा उचलला आहे. शार्दुलने आतापर्यंत ११ वन-डे, १५ टी-२० आणि एका कसोटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या शार्दुलला दुखापतीमुळे गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नव्हती. शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही होते, ज्यात मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता.

दोन महिन्यानंतर आम्ही सराव केला आहे, खूप बरं वाटत आहे अशी प्रतिक्रीया शार्दुलने पीटीआयशी बोलताना दिली.

दरम्यान सरावाआधी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करण्यात आल्याचं पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. खेळाडूंनी सरावासाठी स्वतःचा चेंडू व साहित्य आणलं होतं, जे आम्ही सॅनिटाईज करुन घेतलं. यासोबतच सरावासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूचं थर्मल स्क्रिनींगही करण्यात आलं, असंही स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.