भारताविरूद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर आटोपला. पहिल्या डावांत मिळालेल्या ३३ धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयसाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. स्टीव्ह स्मिथचं अर्धशतक (५५) आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशेनजीक मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या डावात शार्दुलने ९४ धावा देत ३ बळी टिपले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ६१ धावा देत ४ बळी टिपण्याची कामगिरी केली. तसेच फलंदाजी करताना आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत ६७ धावा केल्या. तसेच पहिल्या डावात मॅथ्यू वेड आणि दुसऱ्या डावात जोश हेजलवूडचा झेल टिपला. एकाच सामन्यात ६० किंवा त्यापेक्षा जास्त धावा, ७ किंवा त्यापेक्षा जास्त बळी आणि २ किंवा त्यापेक्षा जास्त झेल टिपणारा शार्दुल हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाला हा पराक्रम करता आलेला नाही.

आणखी वाचा- IND vs AUS: अजिंक्य रहाणेचा मोठेपणा; पंचांना सांगून मॅच बॉल दिला मोहम्मद सिराजला

आणखी वाचा- IND vs AUS: रोहितची गोलंदाजी पाहून दिनेश कार्तिकचं मजेशीर ट्विट

दरम्यान, पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४वर आटोपला. स्टीव्ह स्मिथने दमदार अर्धशतक (५५) ठोकलं. डेव्हिड वॉर्नर (४८), मार्कस हॅरिस (३८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३७) या तिघांनीही चांगल्या छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजला मारता आली आणि त्यांनी भारताला ३२८ धावांचे लक्ष्य दिले.