*  चौथ्या एकदिवसीय सामन्यासह भारताचा मालिकेवर कब्जा
*  रोहित शर्मा, सुरेश रैनाची दमदार अर्धशतके
*  रवींद्र जडेजाची प्रभावी फिरकी
बऱ्याच दिवसांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका विजयाची चव चाखली. विजयाचा दुष्काळ संपल्याची ग्वाही देताना भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाच विकेट राखून विजय मिळविला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-१ असा कब्जा केला. सलामीची जबाबदारी यथोचीतरीत्या पार पाडणाऱ्या रोहित शर्माने (८३) पाया रचला, त्यानंतर सुरेश रैनाने (नाबाद ८९) कळसाध्याय लिहिला.
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हुडहुडी भरवणारी थंडी आणि पसरलेले धुकट वातावरण यांचे आव्हान दोन्ही संघांना पेलवावे लागले. भारतीय गोलंदाजांनी आधी इंग्लिश संघाला ७ बाद २५७ धावांवर रोखले आणि मग १५ चेंडू राखून शानदार विजयाची नोंद केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मग भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील नियंत्रण राखले. परंतु अखेरच्या दहा षटकांत इंग्लिश फलंदाजांनी १०० धावा फटकावल्या. जो रूट (नाबाद ५७) आणि केव्हिन पीटरसन (७६) यांनी या हाणामारीच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकनेही ७६ धावांची संयमी खेळी साकारली.
त्यानंतर भारतच्या डावात गौतम गंभीर, विराट कोहली आणि युवराज सिंग बाद झाल्यामुळे भारताची ३ बाद ९० अशी अवस्था झाली. परंतु त्यानंतर रोहितने रैनासोबत चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी साकारून भारताचा डाव सावरला. शतकाकडे कूच करणाऱ्या रोहितला स्टीव्हन फिनने पायचीत करून तंबूची वाट दाखवली. रोहितने ९३ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह ८३ धावा काढल्या. मग रैनाने भारताला विजयपर्यंत पोहोचविण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने धोनीसोबत पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. धोनी बाद झाल्यावर रैना आणि रवींद्र जडेजा (नाबाद २१) यांनी भारताला विजयश्री प्राप्त करून दिली. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रैनाने ७९ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह ८९ धावांची खेळी साकारत सामनावीर किताबाला गवसणी घातली.
इंग्लिश संघाविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिकाही गमावणाऱ्या धोनीसेनेवर टीका होत होती. परंतु इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय संपादन करून धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटरसिकांना दिलासा दिला आहे. सलामीवीर अजिंक्य रहाणेऐवजी अनपेक्षितपणे स्थान मिळालेल्या रोहितने सलामीला उतरून संधीचे सोने केले. जडेजाने जेड डर्नबॅकला तीन धावा काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, त्यानंतर स्टेडियममध्ये आणि भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये एक अवर्णनीय जल्लोष पाहायला मिळाला.
धावफलक
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक पायचीत गो. अश्विन ७६, इयान बेल झे. कुमार गो. इशांत १०, केव्हिन पीटरसन त्रि. गो. इशांत ७६, ईऑन मॉर्गन झे. युवराज गो. अश्विन ३, समित पटेल झे. आणि गो. जडेजा १, जो रूट नाबाद ५७, जोस बटलर झे. युवराज गो. जडेजा १४, टिम ब्रेसनन झे. युवराज गो. जडेजा ०, जेम्स ट्रेडवेल नाबाद ६, अवांतर १४, एकूण : ५० षटकांत ७ बाद २५७
बाद क्रम : १-३७, २-१३२, ३-१३८, ४-१४२, ५-२२०, ६-२४१, ७-२४१
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-२-३०-०, शामी अहमद ८-०-५८-०, इशांत शर्मा १०-२-४७-२, रवींद्र जडेजा १०-२-३९-३, सुरेश रैना २-०-१०-०.
भारत : गौतम गंभीर झे. बटलर गो. ब्रेसनन १०, रोहित शर्मा पायचीत गो. फिन ८३, विराट कोहली झे. आणि गो. ट्रेडवेल २६, युवराज सिंग पायचीत गो. ट्रेडवेल ३, सुरेश रैना नाबाद ८९, महेंद्रसिंग धोनी झे. मॉर्गन गो. डर्नबॅक १९, रवींद्र जडेजा नाबाद २१, अवांतर ७, एकूण : ४७.३ षटकांत ५ बाद २५८
बाद क्रम : १-२०, २-७२, ३-९०, ४-१५८, ५-२१३
गोलंदाजी : स्टीव्हन फिन १०-१-३९-१, टिम ब्रेसनन १०-१-५९-१, जेड डर्नबॅक ९.३-०-५९-१, समित पटेल ३-०-२१-०, जेम्स ट्रेडवेल १०-०-५४-२, जो रूट ५-०-२४-०.