बीसीसीआयचा पुढाकार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी एन. श्रीनिवासन असताना संघटनेतील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. श्रीनिवासन यांची सद्दी मोडताना, या कंपनीच्या कामाचे स्वरूप आणि त्यासाठी देण्यात आलेला पैसा याची रीतसर चौकशी करण्यात येणार आहे. बोर्डाचे नवे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या प्रतिमा सुधार अभियानाअंतर्गत द्विसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
आपल्या विरोधातील सहकाऱ्यांच्या हालचाली जाणून घेण्यासाठी श्रीनिवासन यांनी हेरगिरीसाठी कंपनीला कंत्राट दिल्याचे उघड झाले होते. यासाठी ९००,००० डॉलर्स एवढी रक्कम खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी अजय शिर्के आणि जी. गंगा राजू यांची समिती तयार करण्यात आली आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निरंजन शाह यांनी बैठकीत सर्वप्रथम हा मुद्दा मांडला. २०१४ मध्ये एका विदेशी संस्थेला अशा स्वरूपाचे कंत्राट देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे एन. श्रीनिवासन यांच्याऐवजी शिवलाल यादव यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते तर संजय पटेल सचिवपदी कार्यरत होते.
‘या कंपनीला विशिष्ट कामासाठी पैसे देण्यात आले आहेत. या कामाचे तपशीलवार स्वरूप समजून घेऊन, त्यांना कुठल्या माध्यमातून पैसे देण्यात आले, त्यासाठी कोणाची मंजुरी होती हे सगळेच मुद्दे चौकशीदरम्यान विचारात घेण्यात येतील,’ असे शिर्के यांनी स्पष्ट केले. ‘बीसीसीआयच्या तिजोरीतून या कंपनीला पैसे देण्यात आले असतील तर आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेऊ. या कंपनीच्या कामाची खरंच गरज होती का याबाबत चौकशी होईल,’ असे राजू यांनी सांगितले.