News Flash

आयपीएल बरखास्त करा!

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरून बाजूला होण्यास सांगत फटकारल्यानंतर क्रिकेट संघटकांमध्ये श्रीनिवासन विरोधी वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

| March 27, 2014 07:04 am

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरून बाजूला होण्यास सांगत फटकारल्यानंतर क्रिकेट संघटकांमध्ये श्रीनिवासन विरोधी वातावरण चांगलेच तापू लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) संपूर्ण चौकशी होईपर्यंत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा बरखास्त करण्याची मागणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी   करत या वादाला नवे वळण दिले आहे. आयपीएलच्या सर्व सामन्यांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
शशांक मनोहर यांची बीसीसीआय अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतरच एन. श्रीनिवासन यांनी सूत्रे हाती घेतली होती. आयपीएलच्या सातव्या पर्वाचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. ‘‘वादग्रस्त ठरलेली ही स्पर्धा युएईत होणार असल्यामुळे स्पर्धेची प्रतिमा आणखी डागाळणार आहे. या देशात मोठय़ा प्रमाणावर चालणारी सट्टेबाजी आणि मॅच-फिक्सिंगच्या घटना पाहता, हा निर्णय धोकादायक आहे. सट्टेबाजी आणि मॅच-फिक्सिंगच्या वाढत्या घटनांमुळेच काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने युएईत सामने आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या न्यायालयीन प्रविष्ट प्रकरणामुळे क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. स्पर्धा युएईत आयोजित करून बीसीसीआयने परिस्थिती आणखीन चिघळवली आहे,’’ असा घणाघातही त्यांनी केला.
‘‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुद्गल समितीच्या अहवालातील मुद्दे ‘अति गंभीर स्वरुपाचे’ आहेत. बीसीसीआय अध्यक्षांनी पदभार सोडल्याशिवाय या प्रकरणाची निकोप चौकशी करणे शक्य नाही. हा घटनाक्रम पाहता, देशातील नागरिकांचा या खेळाप्रती विश्वास पुनरुज्जीवित होईपर्यंत २०१४ची आयपीएल स्पर्धा बरखास्त करावी. पैसा कमावणे हे बीसीसीआयचे उद्दिष्ट नाही. खेळाची स्वच्छ प्रतिमा राखणे, हे लक्ष्य असणे अपेक्षित आहे. स्पॉट-फिक्सिंग, मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे लोकांचा खेळावरील विश्वास उडाला आहे. हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हापासून सर्व सामन्यांची सीबीआयद्वारे चौकशी करा, असे मी सांगत आलो आहे. तसे झाल्यास, या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्ती समोर येतील. आता समोर आलेल्या गोष्टी हिमनगाचे वरचे टोक असू शकते. या प्रकरणाचा परीघ देशभर व्यापक असल्याने सीबीआयने सर्व सामन्यांची सखोल चौकशी करावी,’’ असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणतात, ‘‘क्रिकेट हा आपल्या देशातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. लाखो लोक हा खेळ पाहतात. यातूनच पैसा मिळतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीसीआयची पत सुधारते. लोकांचा विश्वास परत मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या सगळ्यात प्रभावशाली मंडळाच्या कामकाजाला काहीच अर्थ नाही.’’  खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता -बिंद्रा
‘‘फिक्सिंग प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीनिवासन यांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता आणि ते पदावर कार्यरत राहिल्यामुळे भारतीय क्रिकेटवर मानहानीकारक स्थिती ओढवली,’’ असे मत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आयईएस बिंद्रा यांनी व्यक्त केले. ‘‘गेल्या एक वर्षांपासून मी हीच गोष्ट सांगत आहे. चेन्नईतील पहिल्या बैठकीतही मी हीच गोष्ट मांडली होती. त्यांनी पदावर राहणे पसंत केल्यामुळेच अखेर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. भारतीय क्रिकेटसाठी हा काळा दिवस आहे. श्रीनिवासन आणि त्यांच्या कंपूमुळेच ही वेळ आली आहे,’’ असे बिंद्रा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 7:04 am

Web Title: shashank manohar calls for suspension of ipl cbi probe of all matches
Next Stories
1 आनंद जेतेपदाच्या उंबरठय़ावर
2 श्रीनिवासन यांची बचावमोहिम
3 शिवलाल यादव पुढील अध्यक्ष?
Just Now!
X