भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोनच दिवसांत अनुभवी क्रिकेट प्रशासक शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून बिनविरोध नेमणूक झाली आहे.
एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत आयसीसीच्या सर्वसाधारण सभेने घटनादुरुस्तीला मान्यता दिली. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा तात्काळ स्वरूपात राजीनामा दिला. त्यामुळे गुरुवारी ५८ वर्षीय मनोहर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आयसीसीच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, कार्याध्यक्षपदासाठी फक्त मनोहर यांचेच नामनिर्देशन दाखल झाले होते. त्यामुळे मनोहर यांची बिनविरोध निवड होऊ शकली. स्वतंत्र लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष अदनान झैदी यांनी ही निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर मनोहर यांच्या नावाची घोषणा केली.
भारतातील नामवंत वकील अशी ओळख असलेल्या मनोहर यांनी २००८ ते २०११ या कालखंडात पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर गेल्या वर्षी जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर यांची अध्यक्षपदावर पुनर्निवड झाली. यासोबतच आयसीसीचे कार्याध्यक्षपदसुद्धा त्यांच्याकडे चालून आले. ‘‘आयसीसीचे कार्याध्यक्षपद भूषवणे हा एक सन्मान असतो. माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या आयसीसीच्या सर्व संचालकांचा आणि मला सहकार्य करणाऱ्या बीसीसीआयच्या सहकाऱ्यांचाही मी आभारी आहे,’’ अशी प्रतिक्रिया मनोहर यांनी कार्याध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर व्यक्त केली.
आयसीसीचा स्वतंत्र कार्याध्यक्ष या पदाला योग्य वाव मिळावा, या हेतूने सोमवारी आयसीसी कार्यकारी मंडळाने घटनादुरुस्तीमधील अनेक प्रस्तावांना बिनविरोधपणे मान्यता दिली. एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत अध्यक्ष हे पदसुद्धा बरखास्त करण्यात आले आहे.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर भारतीय क्रिकेटच्या शुद्धिकरणाच्या हेतूने सात महिन्यांपूर्वी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा मनोहर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती लोढा यांच्या शिफारशींचा बीसीसीआयकडून अंमलबजावणीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच मनोहर यांनी आयसीसीचे पद भारताकडे टिकून राहावे, म्हणून या पदाचा त्याग केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रशासन सुरळीत करण्यासाठी २०१४ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीची सविस्तर अंमलबजावणी आता होत आहे. खेळाची वाढ होणे हेच प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील,.
– शशांक मनोहर, आयसीसीचे कार्याध्यक्ष