आयसीसीच्या अध्यक्षपदावरुन शशांक मनोहर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी शशांक मनोहर यांच्या कारभारावर टीका करत त्यांच्यावर भारत विरोधी काम केल्याचा आरोप केला आहे. मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटला मोठं नुकसान झालं असून जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटचं महत्व कमी करण्यासाठी मनोहर जबाबदार असल्याचा हल्लाबोलही श्रीनिवासन यांनी केला, ते टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“ज्या क्षणी बीसीसीआयमध्ये नेतृत्वबदल झाला त्यावेळपासून आता आपल्याला भारताचं प्रतिनिधीत्व करता येणार नाही हे मनोहर यांनी ओळखलं. आपल्याला पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळणार नाही, हे समजल्यानंतर मनोहर यांनी याचा बहाणा करत पळ काढणं पसंत केलं. भारतीय क्रिकेटला मनोहर यांच्यामुळे खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे बीसीसीआयशी संबंधित सर्व अधिकारी त्यांच्या जाण्यामुळे आनंदी असतील. जागतिक पातळीवर भारताचं महत्व कमी करण्यामध्ये मनोहर यांचा मोठा वाटा आहे. बीसीसीआयचं नवं नेतृत्व आयसीसीसमोर झुकणार नाही हे माहिती पडल्यावर मनोहर यांनी राजीनामा दिला असं माझं वैय्यक्तीक मत आहे.”

मनोहर यांच्या अनुपस्थितीत आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा तात्पुरते अध्यक्षपदाची सूत्र सांभाळणार आहेत. २०१५ साली मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली होती. सध्या आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी सौरव गांगुली, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्ह्स आणि विंडीज क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख डेव्ह कॅमरुन ही नावं चर्चेत आहेत.