कसोटी मालिकेत भारतीय संघाचे पानिपत झाल्यावर प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघामध्ये मोठे बदल न करता माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना संचालकपदी नेमले. इंग्लंडविरुद्धच्या विजयाचे श्रेय सामनावीर सुरेश रैनाने शास्त्री यांना दिले. संघातील खेळाडूंना शास्त्री यांनी आत्मविश्वास दिला आणि त्यामुळेच आम्ही सामना जिंकू शकलो, असे मत रैनाने व्यक्त केले आहे.
रैना म्हणाला, ‘‘शास्त्री संघाच्या बैठकीमध्ये आले आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधला. या संवादामधून आम्हाला प्रेरणा मिळाली, आत्मविश्वास नव्याने जागृत झाला. जेव्हा आम्ही स्टेडियमला चाललो होतो, तेव्हा ते माझ्या बाजूला बसून खडूस खेलना हैं असे म्हणाले.’’
नियुक्तीनंतर शास्त्री यांनी संघाचा सूत्रधार मीच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर धोनीने फ्लेचरच आमचे प्रमुख आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे भारतीय संघात कुरघोडी सुरू असल्याचे म्हटले जात होते. पण रैनाने मात्र ही गोष्ट नाकारत सारे काही आलबेल असल्याचे म्हटले आहे.
‘‘विश्वचषकापर्यंत फ्लेचर हे आमचे प्रशिक्षक असतील, असे धोनी याने म्हटले होते, तेच आमचे मार्गदर्शक आहेत. शास्त्री संघाशी निगडित सर्व गोष्टींचे काम पाहतील, पण फ्लेचर हेच संघाचे प्रशिक्षक असतील. तुम्हाला याबाबत काय वाटते माहिती नाही, पण संघातील कामकाज पूर्वीसारखेच सुरू आहेत,’’ असे रैना म्हणाला.
शास्त्री यांच्याबद्दल रैना म्हणाला की, ‘‘शास्त्री यांच्याशी बोलताना तुम्ही एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचता, पण त्याकरिता तुम्ही प्रमाणिक असायला हवे. अन्य साहाय्यक प्रशिक्षकही आम्हाला चांगले मार्गदर्शन करीत असून शास्त्री यांनी संघाला आत्मविश्वास दिला आहे.’’