भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीने केलेल्या शिफारशीनुसार रवी शास्त्री यांना २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या संघ संचालकपदावर कायम ठेवण्यात आले आहे.

ऑगस्ट २०१४मध्ये शास्त्री यांची संघ संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. भारतात सहावी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा ११ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा संपेपर्यंत म्हणजेच आणखी सात महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
मागील वर्षी इंग्लंडमध्ये कसोटी गमावल्यानंतर भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू शास्त्री यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतर समालोचक झालेल्या शास्त्री यांनी मग इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला विजयाचा मार्ग दाखवला. शास्त्री यांच्या संघ संचालक कारकीर्दीतील दोन सर्वोत्तम यश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तर श्रीलंकेमध्ये तब्बल २२ वर्षांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीची दखल घेत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने शास्त्री यांना मुदतवाढ दिली आहे. शास्त्री यांच्यासोबत समितीने सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर (फलंदाजी), भरत अरुण (गोलंदाजी) आणि आर. श्रीधर (क्षेत्ररक्षण) यांनाही मुदतवाढ दिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांनी मार्गदर्शकांच्या यशाचे कौतुक केले.