मुंबई क्रिकेट असोसिएशनने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या पात्रता निकषांमध्ये सोमवारी रात्री बदल केले. प्रा. रत्नाकर शेट्टी यांना ही निवडणूक लढविता येऊ नये, यासाठीच निवडणुकीच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आल्याची चर्चा क्रीडाविश्वात आहे.
अहमदाबाद येथील पाकिस्तानविरूद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये एमसीएच्या अधिकाऱ्यांनी तिकीटांचा काळाबाजार केल्याचा आरोप रत्नाकर शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर शेट्टी यांना आपली बाजू भक्कमपणे मांडता न आल्याने त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एमसीएने घेतला होता. या निर्णयाविरोधात शेट्टी यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
सोमवारी झालेल्या असोसिएशनच्या बैठकीमध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल), भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि एमसीएमधून मानधन मिळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला एमसीएची निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक पदावर शेट्टी कार्यरत असल्यामुळे त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची आगामी निवडणूक लढविता येणार नाही. शेट्टी हे गेल्या तीन दशकांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशनशी जोडले गेलेले आहेत. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले आहे.