पावसाच्या अभावी उद्भवणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांची मला कल्पना आहे. त्यांच्याप्रति मला आदर आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक म्हणून आपण एकत्र येणे आवश्यक आहे. मात्र इंडियन प्रीमिअर लीगचे महाराष्ट्रातील सामने रद्द करणे हा त्यावरचा उपाय नाही, असे मत भारताची माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने व्यक्त केले.
तो पुढे म्हणाला, ‘दुष्काळ समस्येच्या मुळाशी जायला हवे. परंतु हा एका राज्याचा प्रश्न नाही. संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांना हा प्रश्न भेडसावतो आहे. त्याकरिता मुंबईतून आयपीएलचे सामने स्थलांतरित करणे उत्तर नाही. ग्लोबल वॉर्मिग आणि हवामान बदलामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली आहे. या समस्येशी संलग्न विभाग उपाययोजनांसाठी काम करत आहेत; परंतु हा संपूर्ण देशवासीयांसमोरचा प्रश्न आहे’.
‘प्रत्येक वेळी आयपीएल स्पर्धेबाबत नकारात्मक गोष्टी मांडणे योग्य नाही. या स्पर्धेच्या व्यासपाठीमुळे असंख्य गुणी खेळाडू समोर आले आहेत. स्पर्धेमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. देशाच्या अर्थकारणाला स्पर्धेचे योगदान आहे’, असे लक्ष्मणने सांगितले.