आयपीएलचे सामने दुष्काळबाधित महाराष्ट्रातून अन्यत्र हलवावे, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र आयपीएलचे सामने हलवणे, हा दुष्काळावरील उपाय नाही. यासाठी दीर्घकाळाची उपाययोजना आखावी लागेल, असे मत भारताचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.
‘‘आयपीएलचा सामना क्रमांक ५, ६ किंवा ७ व्हावा किंवा न व्हावा. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. पाण्याची उणीव भासणाऱ्या ठिकाणी ते पोहोचेल, याची खात्री करून देणाऱ्या योजना राबवण्याची गरज आहे. मी टीव्हीवर जे पाहिले आहे, त्यानुसार काही धरणे तिथे आहेत, पण फक्त एक ते दोन टक्के पाणी तिथे उपलब्ध आहे. याच गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे,’’ असे धोनीने या वेळी सांगितले.
राज्यात पाण्याची कमतरता भेडसावत असताना आयपीएलचे सामने खेळणे योग्य नाही, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. खेळपट्टीच्या देखरेखीसाठी मोठय़ा प्रमाणात पाणी वापरावे लागते, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

‘अश्विनने अनेक कठीण प्रसंगांमध्ये साथ दिली’
* भारतीय संघ अडचणीत असताना फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अनेक कठीण प्रसंगांमध्ये मला साथ दिली आहे. पहिल्या सहा षटकांत किंवा अखेरच्या षटकांत जरी त्याला गोलंदाजी दिली तरी कोणत्याही स्थितीत त्याने जबाबदारीने गोलंदाजी केली आहे, असे धोनीने सांगितले. रविवारी लाव्हा मोबाइलचा सदिच्छादूत म्हणून धोनीच्या नावाची घोषणा केली.
* रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना अश्विनला धोनीने १६व्या षटकात गोलंदाजी सोपवली. याबाबत धोनी म्हणाला, ‘‘अश्विन हा परिपक्व गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोणत्याही षटकात गोलंदाजी देता येते. मुंबईने काही फलंदाज गमावल्यामुळे त्यांच्या मधल्या आणि तळाच्या फळीवर दडपण येणार हे मला माहीत होते.’’