श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० असे पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघाने दमदार फलंदाजीच्या जोरावर मोहालीत एक माहोल निर्माण केलाय. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय फलंदाजीची अवस्था केविलवाणी केली होती. मात्र, मोहालीत भारतीय फलंदाजी पुन्हा बहरात आली. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातील संयमी खेळ दाखवत डावाला आकार दिला. त्यानंतर या जोडीनं शतकी भागीदारी करुन भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे.

शिखर धवनने या सामन्यात वनडे कारकिर्दीतील २३ वे अर्धशतक साजरे केले. त्याने ९ चौकारांच्या मदतीने त्याने ६७ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. श्रीलंकन गोलंदाज सचिथ पथिराणाच्या गोलंदाजीवर धवन बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही अर्धशतक साजरे केले. रोहित शर्मा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या साथीनं भारताच्या डावाला आकार देतो आहे. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आघाडीचे फलंदाजी कोलमडल्यानंतरचा दबावात तो ९ धावाच करु शकला. सध्याच्या घडीला भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली असून, श्रेयस अय्यरला या सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची नामी संधी आहे.

मोहालीच्या मैदानात २०११ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने सर्वाधिक ३५१ धावा उभारल्या होत्या. नॅडरलँडविरुद्धच्या हा सामना दक्षिण आफ्रिकेने तब्बल २३१ धावांनी जिंकला होता. श्रीलंकेविरुद्धची भारतीय संघाची सुरुवात पाहता भारतीय संघ मोहालीच्या मैदानात ३०० चा टप्पा पार करतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.