इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय निवड समितीने महेंद्रसिंह धोनीच्या जागी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं. याचसोबत आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता ऋषभ पंत हाच पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल हे निवड समितीने जाहीर केलं होतं. मात्र वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत ऋषभने फलंदाजीत पुरतं निराश केलं. ऋषभच्या फलंदाजीतल्या या खराब फॉर्ममुळे निवड समितीने पंतला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडही ऋषभच्या खेळावर नाराज आहेत. मात्र भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने ऋषभला आपला पाठींबा दिला आहे.

“ऋषभ पंत गुणवान खेळाडू आहे आणि मला खात्री आहे की तो भारतासाठी खूप वर्ष खेळेल. तो चांगला खेळ करण्याचा मनापासून प्रयत्न करतोय. काही सामन्यांमध्ये तुमच्याकडून धावा होत नाहीत, मात्र त्यामधून तुम्हाला शिकायला मिळतं. प्रत्येकाला या परिस्थितीमधून जावं लागतं आणि मला खात्री आहे ऋषभ यामधून लवकरच बाहेर येईल. तो चांगला खेळाडू आहे आणि त्याला आपला पाठींबा देण्याची गरज आहे. मी सुद्धा अनेकदा अशा खडतर प्रसंगातून गेलो आहे, आतासुद्धा गेलो आहे, हा खेळाचा एक भागच आहे.” एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शिखर ऋषभ पंतच्या कामगिरीबद्दल बोलत होता.

अवश्य वाचा – ……म्हणून विश्वचषकात भारताच्या पदरी पराभव !

दरम्यान, धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. मात्र विंडीज पाठोपाठ आफ्रिकेविरुद्ध मालिकेतही ऋषभने फलंदाजीत पुरती निराशा केली. २ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवड समिती आणि प्रशिक्षक रवी शास्त्री ऋषभच्या खेळावर नाराज असून त्याला अखेरची संधी देण्यात येणार आहे. या मालिकेत चांगला खेळ न दाखवल्यास ऋषभला संघाबाहेर बसवण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.