गेले काही दिवस आपल्या खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या शिखर धवनला अखेर चौथ्या वन-डे सामन्यात सूर गवसला. 143 धावांची खेळी करत शिखर धवनने भारताला 350 धावांचा टप्पा गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला. वन-डे क्रिकेटमधली ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली, तर मोहालीच्या मैदानातलं शतक हे त्याच्या वन-डे कारकिर्दीचं सोळावं शतक ठरलं. यादरम्यान शिखर धवनने List A क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो अकरावा भारतीय खेळाडू ठरला.

याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड,महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, गौतम गंभीर या खेळाडूंनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. आपल्या 239 व्या डावात शिखरने 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. या यादीत शिखर तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने 219 तर महेंद्रसिंह धोनीने 225 डावांमध्ये हा टप्पा पूर्ण केला होता.

List A क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज –

विराट कोहली – 219 डाव
महेंद्रसिंह धोनी – 225 डाव
शिखर धवन – 239 डाव
जॅक रुडॉल्फ – 240 डाव

चौथा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. बुधवारी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर या मालिकेतला अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – मोहालीच्या मैदानात ‘गब्बर-हिटमॅन’ची जोडी ठरली सरस