२०२० वर्षातला पहिला टी-२० सामना पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे भारतीय संघ खेळू शकला नाही. श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्माने विश्रांती घेतलेली असून, डावखुरा सलामीवीर शिखर धवनने संघात पुनरागमन केलं आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून शिखरचं फॉर्मात येणं भारतीय संघासाठी गरजेचं आहे. २०१९ सालात शिखरची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मात्र भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी, शिखर धवन ऐवजी लोकेश राहुलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळायला हवी असं मत व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा –  बूँद से गई…पाऊस नव्हे तर ‘या’ क्षुल्लक चुकीमुळे रद्द झाला सामना !

“श्रीलंकेविरुद्धच्या धावा फारशा महत्वाच्या नाहीत. जर मी निवड समितीचा प्रमुख असतो तर मी धवनला टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात निवडलं नसतं. राहुल आणि त्याच्यात कोणती स्पर्धाच नाहीये. राहुल हा एकमेव पर्याय योग्य आहे. रोहित शर्मासाठी लोकेश राहुल हा सलामीला योग्य पर्याय आहे”, श्रीकांत Star Sports तामिळ वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, पहिला सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे वाया गेल्यानंतर मंगळवारी इंदूरच्या मैदानात दोन्ही संघ समोरासमोर येतील. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारुन नवीन वर्षाची सुरुवात विजयाने करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.