३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषक स्पर्धा दुखापतीमुळे अर्ध्यावर सोडावी लागलेला शिखर धवन, विंडीज दौऱ्यातून भारतीय संघात पुनरागमन करतो आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. अखेर शिखर या दुखापतीमधून सावरला असून, विंडीजविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

अवश्य वाचा – Video : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे तयार, जिममध्ये करतोय कसून मेहनत

या मालिकेसाठी शिखर धवन सध्या कसून सराव करतो आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने, मैदानात स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं विश्वचषकातलं फलंदाजीचं तंत्र बिघडलं होतं. खासकरुन उपांत्य सामन्यात शिखरची अनुपस्थिती भारताला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे विंडीज दौऱ्यात शिखर धवन कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.