IPLच्या २०१९मध्ये होणाऱ्या हंगामासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही संघाने सोमवारी ट्विट करत वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला. पण शिखर हा आर्थिक कारणांमुळे हैदराबाद संघातून बाहेर पडला असल्याची माहिती आता समोर येत आहे.

हैदराबाद संघाकडून खेळताना शिखर धवन हा आर्थिक बाबींबद्दल समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने दुसऱ्या संघात जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती हैदराबाद संघाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिखर धवनच्या बदल्यात दिल्लाच्या संघाला मोठी किंमत मोजोवी लागली आहे. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले आहे.

२००८ साली शिखर धवनने दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा IPLमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा प्रवास मुंबईइंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद असा झाला. धवनने आतापर्यंत १४३ आयपीएल सामने खेळले असून त्यात ३३.२६ च्या सरासरीने आणि १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने एकूण ४०५८ धावा केल्या आहेत.