शिमॉन शरीफ, माजी नेमबाज-प्रशिक्षक

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील खेळाडूंचा सहभाग हेच ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेचे यश म्हणायले हवे. फक्त करोनाकाळापुरतेच नाही तर यातून सावरल्यावरही ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असा विश्वास माजी नेमबाज आणि प्रशिक्षक शिमॉन शरीफ यांनी व्यक्त केला.

करोना विषाणू संसर्गामुळे क्रीडाविश्व ठप्प असताना बुद्धिबळ आणि नेमबाजी या खेळांच्या ऑनलाइन स्पर्धा सुरू आहेत. बुद्धिबळात ऑनलाइन स्पर्धा होणे अपेक्षित होते. मात्र नेमबाजीतही आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन स्पर्धा होऊ शकते, हे करोनाकाळात दिसले आहे. शरीफ यांच्या संकल्पनेतूनच ऑनलाइन स्पर्धा साकारली. ऑनलाइन नेमबाजीसह करोनामुळे क्रीडाविश्वासमोर निर्माण झालेल्या आव्हानांविषयी शरीफ यांच्याशी केलेली खास बातचीत –

* ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेच्या आयोजनाची कल्पना कशी सुचली?

जगातील अन्य देशांसह भारतातही टाळेबंदी घोषित झाली आणि सर्व खेळाडू एकाएकी घरी बसले. नवी दिल्ली येथील विश्वचषक नेमबाजीसारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धा करोनामुळे रद्द झाल्या. खेळाडूंसमोर स्पर्धा खेळण्याचे कोणतेच पर्याय या काळात उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. मात्र अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेतात आणि त्यांची कामे करतात. हे पाहूनच मी ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा घेता येईल का, याबाबत विचार केला. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नेमबाजांशीही चर्चा केली. सर्वानीच त्यासाठी होकार दिला. ही स्पर्धा खेळाडूंसाठी ऑनलाइन ठेवताना त्याला प्रेक्षकदेखील हवे होते. त्यामुळे फक्त ‘झूम’ अ‍ॅपवर ही स्पर्धा खेळाडूंसाठीच मर्यादित न ठेवता ‘फेसबुक’वरून त्याचे थेट प्रक्षेपण समालोचनासहित करण्याचे आम्ही ठरवले. त्यामुळे स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

* करोनामुक्तीनंतरही ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा आयोजित करणार का?

आम्ही आयोजित केलेली पहिली स्पर्धा ही पात्रता फेरीच्या धर्तीवर होती. २५ एप्रिलला झालेली ऑनलाइन स्पर्धा अंतिम फेरी होती. काही नेमबाजांच्या घरी स्पर्धेत सहभाग घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सुविधा आहेत. मात्र काहींनी घराच्या बाल्कनीपासून मिळेल त्या जागी सोईसुविधा करत स्पर्धेत सहभाग नोंदवला. भारतासह काही अन्य देशांमधील नेमबाजांनीही स्पर्धेत भाग घेतला. सध्या हा सहभाग जगातील एकूण नेमबाजांच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे. मात्र ऑनलाइन स्पर्धेमुळे सर्वच नेमबाज करोनानंतर त्यांच्या घरात उपयुक्त सुविधा करून घेतील. करोनाकाळातही या स्पर्धेमुळे खेळाडूंचा स्पर्धात्मक सराव सुरू राहिला हे महत्त्वाचे आहे.

* भारताचे नेमबाज विक्रमी संख्येने ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत. करोनामुळे स्पर्धा लांबणीवर पडल्याचा कोणता परिणाम होईल?

नेमबाजी हा खेळ अनिश्चिततेचा म्हणून ओळखला जातो. सध्या अव्वल स्थानी असणारा नेमबाज पुढील वर्षी अग्रस्थानावर असेलच असे नाही. नेमबाजी हा खेळ असा आहे की क्षणार्धात अव्वल खेळाडूचीदेखील घसरण झालेली दिसते. या स्थितीत सध्या चांगली कामगिरी करणारे नेमबाज पुढील वर्षी ऑलिम्पिकमध्ये यश मिळवतीलच हे खात्रीने सांगता येणार नाही. ऑलिम्पिकमध्ये भारताकडून १५ स्थाने निश्चित झाली आहेत. मात्र ऑलिम्पिकच्या आधी जे खेळाडू लयीत असतील त्यांनाच अंतिम संघात स्थान मिळेल.

* करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वावर कशा प्रकारे परिणाम होईल असे वाटते?

या वर्षी कोणत्याही क्रीडा प्रकारातील स्पर्धा होतील असे वाटत नाही. त्यातच सरकारचे आता पुढील काही महिने मुख्य लक्ष हे क्रीडा स्पर्धापेक्षा दैनंदिन लोकांच्या गरजा भागवण्याकडे असेल. क्रीडा अर्थसंकल्पातही तूट होऊन तो निधी महत्त्वाच्या अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी वितरीत केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रीडा स्पर्धा कधी सुरू होतील हे आता सांगणे अवघड आहे, मात्र या सर्व काळात खेळाडूंना घरच्या घरी स्वत:ला नेहमीसारखे तंदुरुस्त राखण्याचे आव्हान आहे. कोणतेही खेळाडू स्पर्धा म्हटली की जोमाने तयारी करतात, मात्र जर काही महिने स्पर्धाच झाल्या नाहीत तर ते आव्हानात्मक आहे. फक्त भारतातच नाही तर जगात ऑलिम्पिकपासून सर्व क्रीडा क्षेत्रासमोर प्रश्न आहे.