जूनमध्ये तीन वर्षांच्या पुरस्काराचे वितरण
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थीना अखेर दिलासा मिळणार आहे. गेली तीन वर्षे या पुरस्काराची वाट पाहणाऱ्या खेळाडू व संघटकांना पुढील महिन्यात हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली.
शिवछत्रपती पुरस्कार निवड समितीची येथे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत २००९-१०, २०१०-११, २०११-१२ या तीन वर्षांच्या पुरस्कारार्थीच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या तीनही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण एकाच समारंभात केले जाणार आहे. जवळजवळ शंभर खेळाडू व संघटकांना पुरस्कार दिला जाणार असल्यामुळे हा समारंभ शिवछत्रपती क्रीडानगरीतच केला जाणार आहे.
दरवर्षी राज्यातील सर्वोत्तम खेळाडू, संघटक, प्रशिक्षक यांच्याकरिता शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. मात्र गेली अनेक वर्षे या पुरस्कार देण्याबाबत सातत्य राहिलेले नाही. हे पुरस्कार राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत देण्याचा अलिखित नियम आहे. मात्र कधी राज्यपालांना वेळ नाही, तर कधी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आदी विविध कारणास्तव हे पुरस्कार देण्याबाबत एक-दोन वर्षे विलंब झाले आहेत. त्यामुळेच गेले तीन वर्षे या पुरस्कारार्थीची निवड व वितरण होऊ शकले नव्हते. हा पुरस्कार दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी द्यावा असा ठरावही राज्य शासनाने केला होता. मात्र हा ठराव फक्त कागदावरच राहिला होता.