राज्यातील क्रीडापटूंना, त्यांच्या प्रशिक्षकांना आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार सुरू केला. दरवर्षी हा पुरस्कार देणे अपेक्षित असते. मात्र गेले काही वर्षे पुरस्कार जाहीर करण्यापासून ते वितरणापर्यंत होणारा विलंब, शासकीय स्तरावर दिसून येणारी उदासीनता, पुरस्कार देण्यावरून होणारे विलंब यामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा दूर होत चालली आहे. साहजिकच एक वेळ पुरस्कार मिळाला नाही तरी चालेल, पण त्यासाठी होणारा त्रास नको असाच मतप्रवाह अनेक ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक व हाडाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येऊ लागला आहे.

येनकेन कारणास्तव गेली तीन वर्षे रखडलेला हा कार्यक्रम शनिवारी मुंबईत पार पडला. जवळजवळ दोनशे व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या इतिहासात फारच कमी वेळा या पुरस्काराची नियमितता पाळण्यात आली आहे. सवरेत्कृष्ट खेळाडू, संघटक/ कार्यकर्ता, प्रशिक्षक आदी विविध प्रकारांत हे पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे महिला विभागासाठी ज्येष्ठ प्रशिक्षक किंवा संघटकांकरिता जिजामाता पुरस्कार अलीकडेच सुरू करण्यात आला आहे. राज्यातील सर्वोत्तम ज्येष्ठ क्रीडा संघटक किंवा प्रशिक्षकांकरिता जीवनगौरव सन्मान सुरू करण्यात आला आहे. तसेच साहसी क्रीडापटू व दिव्यांग खेळाडूंकरिता स्वतंत्र पुरस्कार सुरू केले आहेत. खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रातील जास्तीत जास्त घटकांना त्यामध्ये समाविष्ट केले जाईल हा शासनाचा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद आहे. असे असूनही पुरस्कारासाठी होणाऱ्या विलंबामुळेच त्याबाबतची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. पुरस्काराचे सोपस्कार करण्यात वेळ घालविण्यापेक्षा सरावावर तो वेळ खर्च केला तर एखादे पदक किंवा विजेतेपद मिळविता येते अशीच भावना खेळाडूंमध्ये दिसून येऊ लागली आहे.

जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज न मागविता स्वतंत्र समितीद्वारे त्याची निवड केली जात आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र राज्यात अनेक असे ज्येष्ठ प्रशिक्षक किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत की ते कधीच प्रसिद्धीच्या वलयात नसतात. नवी दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सविता जोशी, संजीवनी करंदीकर आदी अनेक खेळाडू घडविणारे मोरेश्वर गुर्जर, महिला हॉकीसाठी भरपूर कष्ट करणाऱ्या अर्नवाझ दमानिया, अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू घडविणारे वसंत गोरे, अनिल मोडक, अनेक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडविणाऱ्या स्मिता देसाई-दिवगीकर, मिल्खासिंगसमवेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे अ‍ॅथलेटिक्सचे महर्षी राम भागवत, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक विजय ममदापूरकर, गोपाळ देवांग, वेटलिफ्टिंगसाठी आयुष्य वेचणारे बिहारीलाल दुबे, कुस्तीला श्वासाइतकेच जपणारे गणपतराव आंदळकर, दीनानाथसिंह आदी कितीतरी ज्येष्ठ क्रीडा संघटक किंवा प्रशिक्षक आहेत की ज्यांनी आपल्या खेळाडूंचे यश म्हणजेच पुरस्कार असे मानले आहे. ज्या काळात महिलांनी क्रीडा क्षेत्रात येणे म्हणजे समाजविरोधी कृत्य मानले जायचे अशा काळात टेबल टेनिसमध्ये जागतिक स्तरावर चमक दाखविणाऱ्या मीना परांडे, सुनंदा करंदीकर यादेखील पुरस्काराबाबत उपेक्षितच मानल्या गेल्या आहेत. त्यांच्या काळात शिवछत्रपती पुरस्कारच नव्हते. मात्र त्यांनी टेबल टेनिस क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच आज या खेळाची लोकप्रियता वाढली आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही.

अनेक वर्षे उपेक्षित असलेल्या बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर, ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणाऱ्यांकरिता थेट पुरस्कार देत शासनाने या खेळाची शान वाढविली आहे. मात्र काही खेळांमध्ये केवळ एक-दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूस तसेच त्याच्या प्रशिक्षकास शिवछत्रपती पुरस्कार देणे अन्य अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर अन्याय केल्यासारखेच आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये चमक दाखविली पाहिजे अशी शासनासह सर्वाची अपेक्षा असते. मात्र गेल्या तीन वर्षांचे हे पुरस्कार देताना बॅडमिंटन, बॉक्सिंग, ज्युदो, कनोइंग व कयाकिंग, रोईंग, जिम्नॅस्टिक्स, टेनिस आदी काही खेळांबाबत एक-दोन वर्षांकरिता पुरस्कार विजेताच नसल्याचे दिसून येते. अशा खेळांबाबत अन्य पुरस्काराप्रमाणे येथेही काही नियम शिथिल करून या खेळांची पाटी कोरी न ठेवता भरायला पाहिजे होती.

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या अन्य देशांचे बरेचसे खेळाडू क्लब संस्कृतीमधून मोठे झालेले असतात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनीही भारतात क्लब संस्कृती वाढविली पाहिजे तरच येथील खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकतील असा सल्ला दिला होता. क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांची लोकप्रियता क्लब स्तरावरील वाढत्या स्पर्धामुळेच वाढली आहे हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. बहुतांश शाळा किंवा महाविद्यालयाच्या संघांना प्रशिक्षक देणाऱ्यांमध्ये क्लबच्याच प्रशिक्षकांचा मोठा वाटा असतो. केंद्रीय मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या देशातील सर्वोत्तम संस्थेस पुरस्कार दिला जातो. तसा पुरस्कार राज्य स्तरावर सुरू करण्याची गरज आहे.

ऑनलाइन अर्ज, आक्षेपाची संधी आदी नवीन पद्धत सुरू केली आहे ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या दिवशीचे कार्यक्रम वर्षांच्या सुरुवातीस निश्चित केलेले असतात, त्याप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शासनाने अगोदरपासून निश्चित केला पाहिजे तरच या पुरस्काराची प्रतिष्ठा जपली जाईल.

मिलिंद ढमढेरे milind.dhamdhere@expressindia.com