News Flash

ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपावा!

महाराष्ट्रात अनेक गुणी खेळाडू घडत आहेत. पण ऑलिम्पिक पदक मात्र अद्याप मिळवता आलेले नाही.

ज्येष्ठ अ‍ॅथलेटिक्स खेळाडू व प्रशिक्षक रमेश तावडे (डावीकडून) , शरीरसौष्ठव व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रा. डॉ. अरुण दातार, तसेच शरीरसौष्ठव प्रशिक्षक बिभीषण पाटील यांना शनिवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे उद्गार

महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. महाराष्ट्रात अनेक गुणी खेळाडू घडत आहेत. पण ऑलिम्पिक पदक मात्र अद्याप मिळवता आलेले नाही. टोकियो येथे २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत हा पदकाचा दुष्काळ संपवल्यास तीच छत्रपतींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.

शनिवारी गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात राज्यपाल आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राज्यातील एकंदर १९५ खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटकांना २०१४-१५,२०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षांसाठी शिवछत्रपती राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मैदाने आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सन्मानित करावे, अशी सूचना राज्यपालांनी मांडली. आपल्या भाषणात विद्यासागर राव म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्शल आर्ट्स, घोडेस्वारी, भालाफेक, तलवारबाजी आदी अनेक युद्धकलांचे नैपुण्य आपल्या मावळ्यांना मिळावे, यासाठी कुशल मार्गदर्शक ठेवले. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कुस्तीला चालना दिली. या ठिकाणी आताही अनेक कुस्तीपटू घडत आहेत.’’

‘‘खेलो इंडिया या नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला दुसरे स्थान मिळाले, याबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन. आगामी स्पर्धेत अव्वल स्थान मिळवावे,’’ अशा शुभेच्छा राज्यपालांनी यावेळी दिल्या.

‘‘जमैकासारखे छोटेसे राष्ट्र अ‍ॅथलेटिक्समध्ये आपला ठसा उमटवते. या खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यामुळे तिथे उसैन बोल्ट आणि बिलियन थॉमसन यांच्यासारखे जगातील सर्वात वेगवान धावपटू घडू शकले. मी दरवर्षी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला

जातो. तिथे इथिओपियाच्या धावपटूंचे कर्तृत्व कौतुकास्पद असते. महाराष्ट्राची लोकसंख्या

आणि क्षेत्रफळ हे मोठे आहे. त्या दृष्टीने क्रीडा संस्कृती घडायला

हवी.  संघटना या खेळाडूंनी चालवायला हव्यात,’’ असे राव यांनी सांगितले.

पुरस्कार पद्धतीत पारदर्शकता आणली -तावडे

’ तीन वर्षांचे पुरस्कार देण्यासाठी अडीच वर्षे थांबलो. मात्र आता अडीच मिनिटेसुद्धा आणखी उशीर नको. शिवछत्रपती पुरस्कार पद्धती अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला, असे उद्गार क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडले.

’ ”क्रीडामंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर साडेतीनशे तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशिक्षक आणि संघटकांशी चर्चा करून सर्वात आधी वैयक्तिक आणि सांघिक खेळांसाठी गुणांकन पद्धती बदलली. प्रक्रियेत आणण्यासाठी ऑनलाइन पद्धती राबवण्यात आली. त्यानंतर आलेल्या १४३ तक्रारींची शहानिशा करण्यात आली. मग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली,” असे तावडे यांनी सांगितले.

’ ”बुद्धिबळात इतकी वर्षे पुरस्कार मिळत नव्हते. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी काही सूचना केल्या. त्यानुसार गुणांकन पद्धतीमध्ये बदल केल्यानंतर यंदा सर्वाधिक पुरस्कार हे बुद्धिबळात दिले जात आहेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 4:13 am

Web Title: shiv chhatrapati sports awards maharashtra governor c vidyasagar rao
Next Stories
1 प्रतिष्ठा गमावलेला पुरस्कार!
2 भारत सातत्य राखण्यास उत्सुक
3 विराट हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : रवी शास्त्री
Just Now!
X