सत्ताधारी जगताप यांच्या जाधव गटाकडून अहिर यांच्या तोडणकर गटाचा धुव्वा

‘शिवसेना पुरस्कृत’ कृष्णा तोडणकर गटाने मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यापासून अनेक मातब्बर नेत्यांची पावले वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरकडे वळल्यामुळे या निवडणुकीत भगवे रंग भरले गेले. परंतु अखेरीस सत्ताधारी मारुती जाधव गटाने बाजी मारत कबड्डीचे रंग भरले.

शिवसेना नेते सचिन अहिर रिंगणात उतरल्यामुळे यंदा प्रथमच मुंबई कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत राजकीय रंग चढले. निवडणुकीच्या दिवशी सकाळपासून भारतीय क्रीडा मंदिर परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. परंतु जाधव गटाने याबाबत आक्षेप घेतल्यामुळे ते काढण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे, हेमांगी वरळीकर, विशाखा राऊत, सुनील शिंदे, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, मंगेश सातमकर, अजय चौधरी आणि हरीश वरळीकर अशा काही शिवसेना नेत्यांनीही तोडणकर गटाला पाठबळ देण्यासाठी भारतीय क्रीडा मंदिर परिसरात उपस्थिती राखली. परंतु त्याचा परिणाम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील जाधव गटाच्या मतांवर झाला नाही. आमची ताकद प्रामुख्याने कबड्डी आणि शिवसेनाच आहे, असे जाधव गटाचे विजयी उमेदवार संजय सूर्यवंशी यांनी सांगितले. संघटनेच्या ४९५ सदस्यांपैकी ४८१ जणांनी मतदान केले.

मारुती जाधव गटाचे विजयी उमेदवार

अशोक (भाई) जगताप, मारुती जाधव, शिवकुमार लाड, मनोहर इंदुलकर, विश्वास मोरे, भरत मुळे, शुभांगी पाटील, शरद कालंगण, गो. वि. पारगांवकर, रामचंद्र जाधव, आनंदा शिंदे, संजय सूर्यवंशी, दिनेश पाटील, चंद्रशेखर राणे, महेंद्र हळदणकर, अनिल केशव, विद्याधर घाडी, अनिल घाटे, सुशील ब्रीद, नितीन कदम, मनोहर साळवी, शिवाजी बावडेकर, नितीन विचारे, मिलिंद कोलते, राजामणी नाडार.