नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर शिवसुंदर दास याची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) अनुभवाचा फायदा महिला क्रिकेटपटूंना करून देण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.

शिवसुंदरने २००० ते २००२ या कालावधीत भारताचे २३ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून त्याने १३००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ‘‘महिला संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबादारी निभावताना खूप काही शिकायला मिळेल. या नव्या कामासाठी मी उत्सुक आहे,’’ असे शिवसुंदर म्हणाला.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली शिवसुंदरने ‘एनसीए’मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ‘‘एनसीएमध्ये मी गेल्या ४-५ वर्षांपासून कार्यरत असून द्रविडकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. ही संधी दिल्याबद्दल मी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली यांचा खूप आभारी आहे. फलंदाजांना तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो,’’ असेही शिवसुंदरने सांगितले.

माजी प्रशिक्षक रामन यांना अझरुद्दीनचा पाठिंबा

भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी अलीकडेच महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या डब्ल्यू. व्ही. रामन यांना पाठिंबा दर्शवला आहे. ‘‘रामन यांच्यापेक्षाही क्रिकेटमध्ये अनेक सुपीक डोकी आहेत. रामन यांचे क्रिकेटमधील ज्ञान आणि प्रशिक्षण कौशल्याचा अनेक जणांना लाभ झाला आहे. त्यांच्यापेक्षा अनेक हुशार डोकी आहेत, पण रामन यांच्याकडे क्रिकेट प्रशिक्षणाचा अफाट अनुभव आहे. त्यांना कायम कार्यरत ठेवण्यासाठी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करणार आहे,’’ असे अझरुद्दीन यांनी म्हटले आहे.