भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग याचे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. परंतु त्याचे सहकारी शिवा थापा व थोकचोम नानाओ सिंग यांनी मात्र विजयी वाटचाल करीत उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.
विजेंदरने २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते तसेच त्याने २००९मध्ये जागतिक स्पर्धेतही याच यशाची पुनरावृत्ती केली होती. अलमाटी येथे मात्र त्याला दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. ७५ किलो गटात युरोपियन विजेता व पाचवा मानांकित जेसन क्विंगले याने त्याच्यावर मात केली. लढतीनंतर विजेंदर म्हणाला, ‘‘ही लढत अतिशय रंगतदार झाली. या स्पर्धेसाठी येथे आल्यानंतर मला ताप आला होता. त्यामधून बरा झालो असलो तरी दुबळेपणा बाकी आहे. ही लढत गमावली असे मी मानत नाही, कारण मी सर्वोत्तम क्षमता दाखवत खेळ केला. त्यामुळेच मी चांगल्या लढतीनंतर पराभूत झालो असेच मी मानत आहे. जेसन हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक खेळाडू मानला जातो. त्याच्याविरुद्ध मी हरलो असलो तरी पुढच्या वर्षी मी येथे पदक मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करीन.’’
नानाओ सिंग याला ४९ किलो गटाच्या पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्याने स्कॉटलंडच्या अकील अहमद याचा ३-० असा पराभव केला. त्याला आता पुढच्या फेरीत पोर्ट रिकोचा खेळाडू अॅन्थोनी चाकोन रिव्हेरा याच्याशी झुंजावे लागणार आहे. नानाओ याला गेल्या मोसमात दुखापतींमुळे अनेक स्पर्धावर पाणी सोडावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर त्याचे हे यश उल्लेखनीय मानले जात आहे.
शिवा या चौथ्या मानांकित खेळाडूने फिलिपिनो मारिओ फर्नान्डेझ याच्यावर मात केली. शिवाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्याला आता अर्जेन्टिनाच्या अल्बटरे मेलियन याच्याशी खेळावे लागणार आहे.

भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्षसिंग संधू यांनी खेळाडूंच्या कामगिरीविषयी सांगितले, ‘‘विजेंदर याला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्याने अतिशय जिद्दीने खेळ केला. शिवा व नानाओ यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून पदकाच्या आशा आहेत.’’