दुबई : राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन तसेच जागतिक कांस्यपदक विजेता शिवा थापा यांनी दुबईत सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला शानदार सुरुवात करून दिली. हुसामुद्दीनने (५६ किलो) सलामीच्या लढतीत कझाकस्तानच्या मखमूद सबीरखान याच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. शिवाने (६४ किलो) किर्गिझिस्तानच्या दिमित्री पुचिन याचा सहज फडशा पाडला.

हुसामुद्दीनने दोन वेळा मखमूदचे आव्हान ५-० असे सहज परतवून लावले. पाचही पंचांनी हुसामुद्दीनच्या बाजूने कौल दिला असला तरी त्याला मखमूदच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना जोरदार ठोसे लगावल्यामुळे चाहत्यांचेही मनोरंजन झाले. मात्र हुसामुद्दीनने बचावात सरशी साधत मखमूदवर प्रतिहल्ले चढवले. अंतिम फेरीतही जोरदार ठोसे लगावत हुसामुद्दीनने या सामन्यावर नियंत्रण मिळवले.

भारताच्या शिवा थापाने दुसऱ्या लढतीत पुचिन याच्याविरुद्ध आश्वासक सुरुवात केली. आक्रमक खेळ करणाऱ्या शिवाने बचावातही चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला ही लढत ५-० अशी सहज जिंकता आली. विशेष म्हणजे शिवाने सुरक्षित अंतर ठेवत प्रतिस्पध्र्याचे ठोसे वाचवले.