रिओ ऑलिम्पिकवारी पक्की करण्याच्या उद्देशाने प्रेरित शिवा थापा आणि विकास कृष्णन या भारतीय बॉक्सिगपटूंनी दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या विकासने ७५ किलो वजनी गटातून खेळताना युरोपियन क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या चौथ्या मानांकित पोलंडच्या थॉमझ जबोलोन्सकीवर २-१ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत विकासचा मुकाबला इजिप्तच्या होसाम अब्दिनशी होणार आहे.

ठोश्यास ठोसा असा प्रत्युत्तर हल्ला चढवत विकासने सातत्याने आघाडी मिळवली. पहिल्या आणि दोन्ही फेऱ्यांमध्ये विकासने थॉमझला निरुत्तर केले. तिसऱ्या फेरीत थॉमझने पुनरामगन केले खरे, पण एकूण आघाडीच्या जोरावर विकासने बाजी मारली.

शिवा थापाने ५६ किलो वजनी गटातून खेळताना, दक्षिण आफ्रिका क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मोरोक्कोच्या मोहम्मद हमाऊतवर अशी मात केली. पहिल्या फेरीत मात्र हमाऊतने सरशी साधली होती. दुसऱ्या फेरीत तडाखेबंद आक्रमण करत शिवाने बरोबरी केली. तिसऱ्या आणि अंतिम फेरीत शिवाने हमाऊतला २६ सेकंदात निष्प्रभ केले. डाव्या हाताने दिलेला खणखणीत ठोसा हमाऊतला लागला. निर्धारित वेळेत तो पुन्हा लढतीसाठी तयार होऊ शकला नाही. २१वर्षीय शिवाची पुढची लढत कतारच्या हकान इरसेकरशी होणार आहे.