तिरुवनंतपुरम : देशांतर्गत स्पर्धामध्ये मी यापूर्वी उत्तुंग षटकार लगावले आहेत. त्यामुळेच जगातील कोणत्याही मैदानावर मी षटकार लगावू शकतो, असा विश्वास भारताचा उदयोन्मुख डावखुरा फलंदाज शिवम दुबेने व्यक्त केला. २६ वर्षीय शिवमने रविवारी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारले. या खेळीदरम्यान किरॉन पोलार्डच्या एकाच षटकात त्याने लगावलेल्या तीन षटकारांना चाहत्यांची वाहवा मिळाली. परंतु त्याच्या अर्धशतकानंतरही भारताला हा सामना आठ गडय़ांनी गमवावा लागला. ‘‘ग्रीनफील्ड स्टेडियमचे मैदान भारतातील अन्य मैदानांच्या तुलनेत मोठे होते. परंतु माझ्याकडे कोणत्याही मैदानावर चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावण्याची क्षमता आहे आणि तेच तुम्हाला आजच्या खेळीदरम्यान पाहायला मिळाले. स्थानिक स्पर्धामध्येसुद्धा मी याचप्रकारे खेळतो. त्यामुळे कोणत्याही मैदानाची लांबी अथवा खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे, याचा परिणाम मी माझ्या फलंदाजीवर होऊ देत नाही,’’ असे शिवम  म्हणाला.

पंतला प्रगल्भ होण्यासाठी वेळ द्या – पीटरसन

नवी दिल्ली : यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज ऋषभ पंतला प्रगल्भ होण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने व्यक्त केले. ‘‘पंत हा युवा खेळाडू असून त्याच्यामध्ये अफाट गुणवत्ता आहे. तो सातत्याने चुकांची पुनरावृत्ती करत असला तरी खेळाडू म्हणून प्रगल्भ होण्यासाठी त्याला अजून भरपूर वेळ लागेल. त्याला जितक्या संधी मिळतील. त्यातूनच तो उत्तम क्रिकेटपटू म्हणून घडेल,’’ असे पीटरसन म्हणाला.