17 October 2019

News Flash

शिवनेरी कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्र पोलीस, शिवशक्ती संघाला विजेतेपद

महिलांमध्ये शिवशक्तीने अमरहिंद मंडळावर ३२-२२ अशी सरशी साधत आपले वर्चस्व कायम राखले.

विजेतेपद पटकावणारे महाराष्ट्र पोलीस

मुंबई : दादर येथील शिवनेरी सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी महोत्सवात विशेष व्यावसायिक गटात महाराष्ट्र पोलिसांच्या संघाने विजेतेपद पटकावले. महिला गटात शिवशक्ती संघाने आपले वर्चस्व कायम राखले. व्यावसायिक प्रथम श्रेणी गटात सेंट्रल जीएसटी आणि आयकर संघाने तसेच महाविद्यालयीन गटात वंदे मातरम् कॉलेजने विजेतेपद संपादन केले.

मध्यंतरापर्यंत रंगतदार झालेल्या विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र पोलिसांनी नंतर वर्चस्व गाजवले. बिपिन थले आणि महेंद्र राजपूत यांच्या उत्तम चढायांच्या जोरावर महाराष्ट्र पोलिसांनी महिंद्रा आणि महिंद्रावर दोन लोण चढवत ३२-१७ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. बिपिन थळेने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

महिलांमध्ये शिवशक्तीने अमरहिंद मंडळावर ३२-२२ अशी सरशी साधत आपले वर्चस्व कायम राखले. शिवशक्तीकडून रेखा सावंत, अपेक्षा टाकले व पूजा यादव यांनी विजयात चमक दाखवली. पूजा यादव महिलांमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरली.

व्यावसायिक प्रथम श्रेणी गटात, सेंट्रल जीएसटी आणि आयकर संघाने टीबीएम स्पोर्ट्सवर २८-१९ असा विजय मिळवत विजेतेपद संपादन केले. विजयी संघाकडून भांगेश भिसे, गणेश जाधव आणि विजय दिवेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.

डोंबिवलीच्या वंदे मातरम् महाविद्यालयाने ठाकूर कॉलेजवर ४४-३९ असा विजय मिळवत अंतिम विजेतेपद पटकावले. मध्यंतरापर्यंत १९-१० अशी आघाडी ठाकूर कॉलेजकडे होती. मात्र मध्यंतरानंतर वंदे मातरम्ने दमदार प्रत्युत्तर देत सामना आपल्या बाजूने झुकवला.

 

 

First Published on October 11, 2019 1:42 am

Web Title: shivneri kabaddi tournament maharashtra police win 70